Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात बावीसशे करोना चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध

amit deshmukh
, सोमवार, 23 मार्च 2020 (09:22 IST)
मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
 
देशमुख म्हणाले, मुंबईतील भायखळा येथील जे. जे. महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे चाचणी केंद्र उभारण्यात आले असून यालाही उद्याच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. 
 
शासकीय रुग्णालयाच्या चाचणी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याबरोबरच मुंबईतील सात खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी मान्यता देण्यासंदर्भातही वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे केली होती. यानुसार पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेन्ट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, थायरोकेयर लॅबरोटरीज, एस. आर. एल. डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज, नवी मुंबई या खासगी केंद्रांचा यात समावेश आहे. या प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी तत्वतः मान्यता देण्यात  आली आहे. दररोज प्रत्येकी १०० नमुने तपासण्याची या चाचणी केंद्रांची क्षमता आहे. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच या प्रयोग शाळांमधूनही करोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे.
 
लवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी नागपूर येथील तपासणी केंद्राची क्षमता दोनशे तर अन्य केंद्रांची क्षमता प्रत्येकी शंभर आहे.
 
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सध्या केवळ नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील करोना तपासणी करण्यात येते आणि याची क्षमता १०० तपासण्याचीच आहे. उद्यापासून मुंबई आणि पुणे येथे नव्याने सुरू होणाऱ्या चाचणी केंद्रामुळे सहाशे चाचण्या करण्याची सुविधा नव्याने निर्माण होणार आहे. खाजगी केंद्रांमधून दररोज सातशे तपासण्या होतील. त्याचप्रमाणे लवकरच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणाऱ्या केंद्रातून ८०० चाचण्या अशा एकूण बावीसशे करोना चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात लॉकडाउन, मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू, जाणून घ्या घोषणा