संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले आणि लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सामंत म्हणाले, लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीचे संगीत महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी लतादीदी यांनी फोनद्वारे संगीत महाविद्यालय कसे असावे, त्याचा स्तर काय असावा, अभ्यासक्रम कसा असला पाहिजे आणि त्याच्या गुणवत्तेबाबत जगाने दखल घ्यावी असे महाविद्यालय असावे यासाठी मार्गदर्शन केले होते. मात्र लतादीदी यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत सुरु करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.
दिवंगत लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, लतादीदींचा विचार, व्यक्तीमत्व जगासमोर असावे म्हणून वस्तुसंग्रहालयसुद्धा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संगीत, गायनापलीकडेही लतादीदींचे सामाजिक कार्यसुद्धा मोठे होते. वर्ल्डकपपासून ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांसाठी मदत करण्यासाठी लतादीदींनी पुढाकार घेतला होता. जगात गायनाचे उत्तुंग नेतृत्व करणाऱ्या लतादीदी होत्या. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
लता मंगेशकर यांची कारकीर्द त्यांच्या संगीतातून कायम राहील त्यासाठी त्यांचे विचार-गाणी यावरसुद्धा संशोधन केंद्र सुरु करण्यात येईल, असे सांगून लता मंगेशकर यांना श्री.सामंत यांनी श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमामध्ये लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. यावेळी उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भावना व्यक्त केल्या.