देशभरात लाऊडस्पीकरच्या अजानवरून वाद सुरू आहे अशात दक्षिण मुंबईतील धर्मगुरू आणि विश्वस्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मशिदींमध्ये सकाळी लाऊडस्पीकर लावले जाणार नाहीत असा निर्णय मुंबईतील मोहम्मद अली रोड, मदनपुरा, नागपाडा, मुस्लीमबहुल भागांसह 26 मशिदींच्या धर्मगुरूंनी सुन्नी बादी मशिदीत बैठक घेऊन एकमताने हा घेतला आहे.
त्यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की लाऊडस्पीकरवरून सकाळची अजान वाचली जाणार नसून सर्व मशिदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जाईल. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत अजान आणि लाऊडस्पीकरचा वापर केला जाणार नाही.
मनसेनं आज 4 तारखेची डेडलाईन दिल्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण असून रात्रीपासूनच ठिकठिकणी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर आज सकाळपासून धरपकड सुरू होती. पण, मुंबईत आज अनेक मशिदीवर मात्र शांततेचा निर्णय घेण्यात आला.
लाऊडस्पीकरच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांना सातत्याने अटक करून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. शिवाजी पार्क परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणीमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक केली. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
देशपांडे, धुरी आणि इतर दोघांवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 308 (हत्येचा प्रयत्न), 353 (लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी फौजदारी बळाचा वापर), 279 (असुरक्षित) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये कलम 336 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
याप्रकरणी संतोष साळी याला अटक करण्यात आली असून, देशपांडे, धुरी आणि वाहन चालकाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.