राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा बुधवारी मुंबईत मोर्चा काढणार आहे. याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यासहित इतर नेत्यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सरकार दाऊदचे समर्थक आहे काय? अशी विचारणा करत घोषणा देण्यात आल्या. आशिष शेलार यांनी यावेळी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे. नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडी दिली असून जामीन मंजूर केलेला नाही याचा अर्थ न्यायालयसुद्धा सक्षमपणे काम करत आहे. तरीही केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा सरकारमध्ये बसलेल घेत नाहीत. दुख: तर उद्धव ठाकरे यात सहभागी आहेत याचं आहे”.