Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईसह राज्यातील काही शहरांत RT-PCR तपासण्यांमध्येही अडचणी

Webdunia
बुधवार, 14 एप्रिल 2021 (18:09 IST)
-जान्हवी मुळे
महाराष्ट्रात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आणि बेड्सची कमतरता जाणवत असतानाच अनेकांना तपासणी करतानाही अडचणी येत आहेत.
 
विशेषतः मुंबई परिसरात RT-PCR चाचण्यांना नेहमीपेक्षा बराच जास्त वेळ लागतो आहे.
 
खरं तर RT-PCR टेस्ट ही कोव्हिडविरुद्धच्या युद्धातली पहिली पायरी आहे. या तपासणीसाठीच अडथळे आले, तर पुढच्या लढाईवरही परिणाम होतो. उपचारांना विलंब होणं, मधल्या काळात इतरांना संसर्ग होणं अशा घटनाही घडत आहेत.
 
नेमकं लोकांना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? त्यामागची कारणं काय आहेत आणि टेस्टचा निकाल येईपर्यंत कोणती काळजी घ्यायला हवी?
 
टेस्टिंगमध्ये अडचणींची भर
नवी मुंबईत राहणाऱ्या कृणाल शिंदे यांना पाच एप्रिल रोजी कोव्हिडची लक्षणं जाणवू लागली. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांनी दुसऱ्या दिवशी टेस्ट करायचं ठरवलं आणि परिसरातल्या खासगी लॅब्सशी संपर्क साधला.
 
पण घरी तपासणीसाठी कोणीही लगेच येऊ शकणार नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. एका प्रयोगशाळेकडून त्यांना आठ एप्रिलची वेळ मिळाली, पण निकाल यायला त्यापुढे दोन दिवस लागणार होते.
 
कृणाल यांनी मग सरकारी तपासणी केंद्रांमध्ये जायचं ठरवलं. स्वतःच्या खासगी वाहनातून ते नेरुळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात ते पोहोचले. तिथे मोठी रांग होती आणि किमान दोन-तीनशे लोक तपासणीसाठी आले होते.
 
कृणाल यांना दुसऱ्या केंद्रांवर जाण्याचा सल्ला देण्यात आला. पण दोन-तीन सेंटर्समध्ये किट्स संपल्याचं सांगण्यात आलं.
 
शेवटी दुपारी एका खासगी प्रयोगशाळेत कृणाल यांचा स्वाब घेण्यात आला, पण त्यासाठीही त्यांना तासभर थांबावं लागलं. आठ तारखेला, म्हणजे स्वाब घेतल्यापासून दोन दिवस उलटून गेल्यावर निकाल आला. कृणाल यांना कोव्हिड झाल्याचं त्यातून स्पष्ट झालं.
 
कृणाल यांनी स्वतःला आधीच घरात विलगीकरणात ठेवलं होतं आणि त्यांची परिस्थिती पाहून फॅमिली डॉक्टरांनी टेस्टचा निकाल येण्यापूर्वीच उपचार सुरू केले होते. पण एखाद्यानं अशी काळजी घेतली नाही, त? असा प्रश्न मात्र त्यांना पडला आहे.
 
तपासणी केंद्रांवर भार वाढला
आरटी-पीसीआर टेस्टबाबतीत गेल्या काही दिवसांत असा अनुभव आलेले कृणाल एकटेच नाहीत. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारमध्येही अनेकांना असाच अनुभव आला आहे. तर मुंबई परिसराबाहेरही काही ठिकाणी अडचणी जाणवत आहेत.
 
अहमदनगरमध्ये तपासणीचा निकाल येण्यासाठी काहींना पाच ते सहा दिवस वाट पाहावी लागली. त्याविषयी स्थानिक पत्रकार केदार भोपे सांगतात, "अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात दिवसाला दोन ते अडीच हजार जणांची तपासणी करण्याची क्षमता शकते. पण तिथे रोज तीन ते सव्वातीन हजार लोक तपासणीसाठी येत आहेत. त्यांचे सॅम्पल घेतले जातात, पण चाचण्या होऊन निकाल लागेपर्यंत वेळ लागतो आहे."
 
नगरमध्ये काही प्राथमिक केंद्रांवर तपासण्या होत होत्या, पण तिथे आता लसीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे तिथल्या तपासण्या थांबल्या आहेत. केदार भोपे सांगतात, "खासगी लॅब्ज पुरेशा नाहीत आणि अनेकांना त्या परवडणाऱ्या नाहीत. लोक तपासण्यांसाठी येतायत, पण निकाल येईपर्यंत वेळ लागतो आहे. मधल्या काळात ते नियम पाळत नाहीत आणि संसर्ग पसरत राहतो."
 
नाशिकमध्येही तपासण्यांचा निकाल येईपर्यंत 48 ते 72 तास लागत आहेत. बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अनघा पाठक यांनी त्याविषयी एका खासगी लॅबचालकाकडून माहिती घेतली. "गर्दी वाढली आहे आणि त्या तुलनेत किट्स किंवा कर्मचारी कमी आहेत. काही काही सरकारी केंद्रांवर एकच व्यक्ती स्वाब जमा करण्यासाठी आहे."
 
नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या लोकांचं प्रमाण एवढं वाढलं आहे, की जिल्ह्याचे प्रलंबित निकाल दहा हजारांवर गेले आहेत, अशी माहिती अनघा यांनी दिली आहे.
 
टेस्टिंगमधल्या उशिरानं प्रवासात अडचणी
 
अंधेरीला राहणाऱ्या प्रेरणा मीडियात काम करतात. गेल्या महिन्याच्या म्हणजे मार्चच्या सुरुवातीला RT-PCR चाचणी केली होती, तेव्हा 20 तासांच्या आत त्यांना निकाल मिळाला होता. पण महिनाभरानं म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा तपासणी केली तेव्हा निकालासाठी चार दिवस लागल्याचं त्या सांगतात.
 
"गेल्या आठवड्यात काही रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आम्हाला दोन दिवस विलगीकरणात राहावं लागलं आणि परत तपासणी करावी लागली. आदल्या दिवशी नोंद करूनही दुसऱ्या दिवशी दुपारनंतरच स्वाब घेण्यासाठी ते आले. त्यानंतर तीन दिवसांनी मला निकाल मिळाला. सुदैवानं मी निगेटिव्ह होते."
 
प्रेरणा यांची बहीण अमेरिकेत राहते आणि त्यांच्या आई या आठवड्यात तिथे रवाना झाल्या. पण विमानानं जाण्याआधी आईची टेस्ट वेळेत करून घेण्यातही त्यांना अडचणी आल्या.
 
"आमच्या एयरलाईननं अँटीजेन टेस्ट चालेल असं सांगितलं, त्यामुळे आम्ही ती करून घेतली, त्यामुळे प्रवासाला जाऊ शकलो. सुदैवानं एयरपोर्टवर जाण्याआधीच RT -PCR टेस्टमध्येही निगेटिव्ह असल्याचा अनुभव आला."
 
प्रेरणा यांचा अनुभव ऐकल्यावर प्रश्न पडतो, की महिनाभरात असं काय बदललं आहे, ज्यामुळे RT-PCR चाचण्यांना वेळ लागतो आहे?
 
प्रयोगशाळा काय सांगत आहेत?
त्याविषयी आम्ही प्रेरणा यांनी जिथे टेस्ट केली, त्या प्रयोगशाळेशी संपर्क साधला. तिथल्या एका तज्ज्ञांनी सांगितलं की, "मार्चच्या अखेरीस सरकारनं निर्बंध लावले, तेव्हा ऑफिसेस, दुकानं आणि होम डिलिव्हरी करणाऱ्यांना RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे अचानक टेस्टिंगसाठी गर्दी वाढली."
 
वाढती रुग्णसंख्या पाहून आता लोकही खबरदारी घेतायत आणि काही डॉक्टर्सही लगेच टेस्ट करायला सांगतायत असं ते म्हणतात. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती दिली.
 
"कोव्हिडला रोखण्यासाठी टेस्ट वाढवायलाच हव्यात. त्यामुळे टेस्टिंगसाठी जास्त लोक येतायत हे चांगलंच आहे. पण गेल्या आठवड्यात अशी अचानक वाढ झाली, त्यासाठी आमची काही सेंटर्स तयार नव्हती.
 
"आम्ही लवकरात लवकर निकाल द्यायचा प्रयत्न करतो आहोत. विशेषतः गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या नमुन्यांना प्राधान्य द्यायचा आमचा प्रयत्न आहे," असं त्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
मुंबईत कोव्हिड चाचणी करणाऱ्या मोठ्या खासगी लॅब्जची अनेक केंद्र आहेत. काही भागांत या लॅब्ज इतर छोट्या लॅब्जना रुग्णांचे स्वाब सॅम्पल घेण्याचं कंत्राट देतात. काही खासगी लॅबमध्ये टेस्ट किट्स संपल्यामुळे RT-PCR चाचण्या शनिवारी थांबण्यात आल्या.
 
"टेस्ट किट्सचा तुटवडा जाणवतो आहे, पण पुढच्या काही दिवसांत तो दूर होईल. शनिवारी आणि रविवारी आमच्याकडे स्टाफ कमी असतो," असं या लॅबच्या संचालकांनी सांगितलं.
 
मुंबईत रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, तर निकाल थेट न कळवता महापालिकेला आधी माहिती कळवावी लागते. तिथून रुग्णाला निकाल मिळेपर्यंत आणखी काही वेळ जात असल्याचा अनुभवही काहींना आला आहे.
 
तपासण्यांमध्ये येत असलेल्या अडचणी पाहून राज्य शासनानं कार्यालयांमध्ये, डिलिव्हरी किंवा वाहतूक कर्मचाऱ्यांसाठीचे RT-PCR चे नियम शिथिल केले आहेत. इथे आता अँटीजेन टेस्टही चालणार असून तिचा निकाल तुलनेनं लवकर मिळतो आहे. तसंच येत्या काही दिवसांत RT-PCR चाचण्यांच्या बाबतीतही परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
 
इतर शहरांत काय परिस्थिती आहे?
बीबीसीच्या प्रतिनिधींनी आणि स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा शहरांत परिस्थिती तुलनेनं चांगली आहे. तिथे तुरळक अपवाद वगळता 24 ते 48 तासांत निकाल येतो आहे.
 
रत्नागिरीत मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी असल्यानं अजून तरी चाचणीच्या बाबतीत आरोग्य यंत्रणेवर ताण पडलेला नाही, असं पत्रकार मुश्ताक खान सांगतात. "रत्नागिरीमध्ये 24 तासात चाचणीचे अहवाल प्राप्त होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून दिवसाला 800 ते 1000 स्वाब घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या तरी कोणतेही निकाल प्रलंबित नाहीत."
 
रायगडच्या अलिबागमध्येही तीच स्थिती आहे. अलिबागमधल्या पत्रकार मानसी चौलकर सांगतात, "धोकावडे सारख्या आमच्या गावातही सध्या 24 तासांच्या आत कोव्हिड चाचणीचा निकाल येतो आहे, कारण इथल्या केंद्रांवर अजून तेवढा रुग्णांचा भार पडलेला नाही. पण अनेक लोक अजूनही तपासण्या करत नसल्याचं दिसून येतंय."
 
सध्या राज्यात किती टेस्टिंग होत आहे?
महाराष्ट्रात कोव्हिडची पहिली लाट सुरू झाली, तेव्हा सुरुवातीला केवळ पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात RT-PCR चाचण्यांची सोय होतील. वर्षभरानंतर राज्यातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांत आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये या तपासणीची सोय करण्यात आली आहे.
 
राज्यात जवळपास सव्वादोन कोटी तपासण्या झाल्या आहेत आणि दिवसाला दोन ते अडीच लाख तपासण्या होत हेत. यात सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमधल्या तपासण्यांचा समावेश आहे.
 
तपासणीला वेळ लागत असेल, तर काय करायचं?
तपासणीचा निकाल येईपर्यंतच्या काळात कोणती काळजी घ्यावी, याविषयी आम्ही काही डॉक्टरांशी बोललो. त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा.
कोव्हिडची लक्षणं दिसत असतील, तर लगेच डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधा. ते तुम्हाला औषधं सांगतील, ती वेळेत घ्या.
कधीकधी कोव्हिड तपासणीचा निकाल येण्याआधीच डॉक्टर तुम्हाला इतर चाचण्या करायला सांगू शकतात आणि त्यावरून तुमच्यावर उपचार केले जातात. एचआरसीटी स्कॅन म्हणजे छातीचं स्कॅन काही रक्ताच्या चाचण्या तुम्हाला करायला सांगितल्या जाऊ शकतात. मात्र या चाचण्यांना जाताना पूर्ण खबरदारी घ्या. सतत मास्क वापरा आणि कुणाशीही जवळचा संपर्क टाळा.
आजारी व्यक्तीनं स्वतःला विलगीकरणात ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे कुठेही बाहेर जाऊ नका. घरातील इतर एखाद्या व्यक्तीला तुम्ही औषधं आणायला सांगू शकता, काही शहरांत दुकानदार औषधं आणि इतर सामान घरी पोहोचवण्याचीही सोय करू शकतो.
घरातील इतर सर्व व्यक्तींपासून दूर राहा. विशेषतः लहान मुलं, वयस्कर व्यक्ती आणि इतर आजारी व्यक्तींशी संपर्क अजिबात टाळावा.
घरात सतत मास्क घालूनच राहा.
तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर तुमची काळजी घेण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला तुमच्या संपर्कात येऊ द्या. पण ती व्यक्ती जवळ असतानाही मास्क घालणं विसरू नका.
आपलं जेवणाचं ताट, पाण्याचं भांडं, कपडे इतरांमध्ये मिसळू नका. विलगीकरणाचे असे सगळे नियम पाळा.
तुम्हाला कोणतीही लक्षणं दिसत नसतील तरी टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहणं गरजेचं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख