आज रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. केंद्र सरकारला आधीच यासंदभार्तील परवानगीच पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर यावर अंमलबजावणी करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद केली जाणार आहे.
याआधी सरकारने राज्यात कलम १४४ आणि संचारबंदी लागू करत एसटी व खासगी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर आता देशांर्गत सेवाही बंद करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. देशात कोरोनाचा प्रसार हा अधिकतर परदेशातून आलेल्या लोकांमुळे झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसंच राज्यावर आलेल्या या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करू नये. मास्काचा काळाबाजार होता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली. तर सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा, असं त्यांनी म्हटलं. यावेळी देशांतर्गत सेवा बंद केल्याने व विविध परताव्यांची अंतिम तारीख पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मुखमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.