कल्याण-डोंबिवलीतील आता हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिकेनेच तसे आदेश दिले आहेत. निर्बंधांमध्ये शिथिलता मिळू लागल्याने कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांवर तसंच हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळेच अशा ठिकाणाहून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता बार, हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणं सक्तीची करण्यात आले आहे.
पुढील ७ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वत: खर्च करूनच कोरोना चाचणी करायची आहे. तसेच त्याचा अहवाल moh.kdmc@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवायचा आहे. केडीएमसीच्या सर्व प्रभाग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमध्ये भेट देऊन याबाबत खातरजमा करण्यासही सांगण्यात आले आहे. जे या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.