लसीकरणासाठी मुंबई मनपा सज्ज आहे. मात्र लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोलून दाखवलं आहे.
महापौर पेडणेकर म्हणाल्या, आपण जर प्रत्येक वॉर्डसाठी एक लसीकरण केंद्र देण्याचं ठरवलं तर, लसीकरणाचं प्रमाण वाढणार आहे. खासगी रूग्णालयांना देखील आपण लसीकरणासाठी परवानगी देतो आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मनुष्यबळ घेऊन तयार देखील राहणार, पण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का? ज्या पद्धतीने मागील काही दिवस जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे आपण लसीकरण करत आहोत. लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली व जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.
कोविन अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतरच व लस मिळत असल्याची खात्री झाल्यावरच लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने गेलं पाहिजे. आयुक्तस्तरावर सध्या चर्चा सुरू आहे, अंतिम टप्प्यात जेव्हा सगळी गाईडलाइन येईल तेव्हा सर्वांना माहिती दिली जाईल. असं देखील महापौर पेडणेकर यांनी यावेळी सांगितलं.