पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.”
कोणकोणत्या प्रकल्पांचे भूमीपूजन होणार?
17182 कोटींच्या 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. हे प्रकल्प वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडुप, घाटकोपर या ठिकाणी स्थित आहे.
यामुळे मुंबईची सांडपाणी प्रक्रिया क्षमता प्रतिदिन : 2464 दशलक्ष लिटर इतकी होईल आणि यामुळे 80% लोकसंख्येला लाभ होईल.
बृहन्मुंबई महापालिकेच्या 3 रुग्णालयांचे 1108 कोटी खर्चासह बांधकाम आणि पुनर्विकास होणार आहे. ही रुग्णालयं गोरेगाव, भांडुप, ओशिवरा या ठिकाणी स्थित आहेत. यामुळे २५ लाख गरजूंना लाभ मिळेल.
6079 कोटी खर्चांसह 400 रस्त्यांचे भूमिपूजन होणार आहे. यासोबतच रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल तसेच मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याचं काम करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. वारसा वास्तूचे जतन, पार्किंगसाठी जागा आणि इमारत हरित प्रमाणित होणार आहे. यासाठी 1813 कोटी रूपयांचा खर्च येईल.
कोणत्या गोष्टींचे लोकार्पण?
मेट्रो मार्गिका 2 अ (दहिसर पूर्व – डी एन नगर) 26,410 कोटी खर्चासह, 18.6 किमी मार्गिका आणि 17 स्थानकं.
मेट्रो मार्गिका 7 (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व ) 6208 कोटी खर्चासह 16.5 कि.मी. मार्गिका आणि 13 स्थानके असतील.
या मेट्रो मार्गांच्या कामाची सुरूवात 2015 साली झाली होती. या मेट्रो भारतात बनलेल्या आहेत.
बृहन्मुंबई मनपाच्या 20 नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण होणार आहे.
इथे मोफत औषधे, वैद्यकीय तपासण्या, मोफत 147 रक्त चाचण्या, विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला गरजूंना मिळेल.
लाभ वितरण
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वितरण करण्यात येईल. 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना याचा लाभ होणार आहे.
पंतप्रधान दौऱ्यामुळे वाहतूक बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत रेल्वे तसंच रस्ते मार्गात बदल करण्यात आलेले आहेत.
आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही काळासाठी बंद असणार आहे. बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाब्याकडे) तसंच 5.30 ते- 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतूक संथ गतीने सुरू असेल.
मुंबईतील वाहतूकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून वेळोवेळी माहिती मिळणार आहे. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.