दसरा मेळाव्याला सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात रस्सीखेच सुरू आहे. या संदर्भात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी (23 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली आहे.
दोन गटाकडून परवानगीसाठी अर्ज आल्याने आम्ही पोलिसांचा अभिप्राय मागवल्याचं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे.
शिंदे गटाचे अर्जदार आमदार सदा सरवणकर यांच्या अर्जाला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेने म्हटलंय, 'कायदा आणि सुव्यवस्था यादृष्टीने आम्हाला पोलिसांचा अभिप्राय हवा होता. त्यानुसार शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने म्हटलंय की, कोणत्याही एका अर्जदाराला परवानगी दिल्यास शिवाजी पार्क संवेदनशील परिसरात कायदा,सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा पोलिसांचा अभिप्राय पाहता तुमचा परवानगी अर्ज आम्ही नामंजूर करत आहोत.'
दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पालिकेच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांचे वकील म्हणाले, "आम्हाला आज बीएमसीची नोटीस मिळाली आहे की, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देऊ शकत नाही. आम्ही याला चॅलेंज करत आहोत."
एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने मुंबईतील बीकेसीच्या मैदानासाठी अर्ज करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. शिंदे गटाला सभेची परवानगी मिळाली आहे.
आता उद्धव ठाकरेंसमोर शिवाजी पार्क मैदानाचा पर्याय शिल्लक आहे. पण काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास या मैदानाची परवानगी मिळते की नाही अशी भीती देखील आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
पूर्वपरवानगी मागूनही मुंबई महापालिकेडून उत्तर मिळालं नाही. पालिका प्रशासनावर राज्य सरकराचा दबाव असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
1966 पासून शिवसेना पक्ष म्हणून शिवाजी पार्कावर दस-याच्या दिवशी मेळावा घेते. त्यामुळे यादिवशी देशभरातील कार्यकर्ते कोणत्याही निमंत्रणाविना शिवाजी पार्कवर दाखल होतात. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी, असा दावा शिवसेनेनं याचिकेत केला आहे. या याचिकेवर आज (22 सप्टेंबर) न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरेंसोबत असलेले शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले होते की, जर एमएमआरडीचे मैदान मिळण्यासाठी प्रथम आल्यास प्रथम प्राध्यान्य हा निकष लावला असेल तर त्याप्रमाणे आम्हाला शिवाजी पार्कातील मैदान मिळावे.
शिवाजी पार्काच्या मैदानाबाबतचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा कुठे होईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.