माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 9 एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आलीय. सीबीआयलाही त्यांची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आलीय.
सचिन वाझे हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात बुधवार (7 एप्रिल) याविषयीची सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे सीबीआयला आदेश दिले होते.
सीबीआयला आता सचिन वाझे यांची चौकशी करण्याचीही परवानगी देण्यात आलीय.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपये खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता. सचिन वाझे यांनी 100 कोटी रुपयांच्या खंडणीबाबत माहिती दिल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला होता.
कोर्टाच्या आदेशानुसार सचिन वाझे 9 एप्रिलपर्यंत NIA कोठडीत असतील आणि तिथेच सीबीआय त्यांची चौकशी करेल. त्याचबरोबर विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. विनायक शिंदे आणि नरेश गोरची चौकशी पूर्ण झाली असून आणखीन कोठडीची गरज नसल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं.
सचिन वाझे यांच्याकडून 36 लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे, हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं NIA ने कोर्टात म्हटलं.
ज्या गाडीमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती, ती स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. ते या कटात सामील होते आणि त्यातच त्यांचा जीव गेला असा दावा NIA ने कोर्टात केला.