करोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाउन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १ जुलै ते ११ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. भाजी तसंच मासळी बाजारदेखील या काळात बंद असतील. मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
“ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घऱात राहणं अपेक्षित आहे.