Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आईच्या मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवले, तरुणीला अटक

आईच्या मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवले, तरुणीला अटक
, बुधवार, 15 मार्च 2023 (16:27 IST)
मुंबईच्या लालबाग परिसरातील एका फ्लॅटमध्ये तब्बल तीन महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत राहत असलेल्या तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले होते.
 
पोलिसांना घटनास्थळाहून इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरी देखील सापडली आहे.
 
या प्रकरणात संबंधित तरूणीनेच आपल्या आईचा खून केला, असा संशय पोलिसांना असल्याची माहिती मुंबईच्या झोन 4 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी दिली.
 
मुंबईतील लालबागसारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारची घटना समोर आल्यामुळे या बातमीने आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकं प्रकरण काय?
लालबागमध्ये एक 55 वर्षीय महिला आपल्या 23 वर्षीय मुलीसोबत गेल्या 16 वर्षांपासून राहत होती.
पूर्वी विरारमध्ये राहत असलेली ही महिला आपल्या पतीच्या निधनानंतर लालबाग परिसरात वास्तव्याला आली. याठिकाणी जवळच महिलेचा भाऊसुद्धा राहत असल्यामुळे भेटणं सोयीस्कर होईल या उद्देशाने आई आणि मुलगी लालबागमधील एका इमारतीत फ्लॅटमध्ये राहायचे.
महिलेचा भाऊ नियमितपणे आपल्या विधवा बहिणीची भेट घेत असे. भाऊ महिलेला उदरनिर्वाहासाठी दरमहा आर्थिक मदतही करायचा.
 
मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून भावाची आपल्या बहिणीसोबत भेटच होऊ शकली नाही. भाऊ कधीही महिलेच्या घरी गेला असता त्याची भाची त्याला कोणतं ना कोणतं कारण सांगून दारातूनच परत पाठवून द्यायची.
 
कपाटात ठेवला होता मृतदेह
मंगळवारी (14 मार्च) महिलेचा भाचा (संबंधित भावाचा मुलगा) आपल्या आत्याची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.
 
पण त्यालाही त्याच्या आतेबहिणीने परत पाठवून दिलं. पण तरुणीच्या अशा विचित्र वागण्यामुळे तिच्या मामेभावाला संशय आला. त्याने थेट काळाचौकी पोलीस चौकी गाठून घटनाक्रम कथन केला.
 
संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित तरुणीला दरवाजा उघडण्यास सांगितलं.
 
पोलीस घरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागत असतानाही तरूणी आपली आई झोपली आहे, असंच कारण त्यांना सांगत होती.
 
पण, अखेरीस पोलीस संबंधित फ्लॅटमध्ये शिरले. त्यांनी घराची तपासणी केली असता 55 वर्षीय महिलेचा मृतदेह कपाटात एका प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला.

तरुणीची उडवाउडवी
मृतदेह बराच काळ ठेवल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत होता आणि त्यातून प्रचंड दुर्गंधही येत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात पाठवून दिला.
 
तरुणीकडे याबाबत चौकशी केली असता, याबाबत मला काही माहीत नाही, असं म्हणत तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
 
महिलेच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली असून शवविच्छेदनाचा अहवालही प्राप्त झाला आहे.
 
महिलेचा मृतदेह सुमारे तीन महिन्यांपासून पडून असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
 
संबंधित तरूणी इतके महिने मृतदेहासोबत राहत होती. शिवाय, बराच काळ ती घराबाहेरही पडलेली नव्हती. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती प्रवीण मुंढे यांनी माध्यमांना दिली.

Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धावत्या कार मधून रस्त्यावर उधळल्या नोटा, पोलिसांनी अटक केली