यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने सर्वच सण-उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच तेजस ठाकरे यांनी लालबागचा राजा, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले.
कोरोनाचे संकट बऱ्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे. गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले मुक्त आणि निर्भय वातावरण निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश निर्भय कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर, असे साकडे शिवसेनेने घातले आहे.
राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांकडून हिंदू सण मोकळे केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच मोकळे राहिले आहे काय? विरोधी पक्ष, नेते, सरकारचे टीकाकार यांची सत्ताधिकार आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबी केली जात आहे. राज्या-राज्यांतील बिगर भाजप सरकारे शक्य होईल त्या मार्गाने बरखास्त केली जात आहेत. प्रादेशिक पक्षांचे तर नामोनिशाण संपवून टाकण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करीत आहेत, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.