संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. रविवारी दिवसभराच्या चौकशीनंतर ई़डीनं त्यांना संध्याकाळी ताब्यात घेतलं होतं.
त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राऊत यांच्या भांडूपमधल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
दरम्यान दुसरीकडे स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांचा कथित कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यानंतर राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झालीय.
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने रविवारी कारवाई केली आणि त्यांच्या भांडुप निवासस्थानी छापे घालून साडेअकरा लाखांची रोकड जप्त करून अधिकाऱ्यांनी राऊत यांना ताब्यात घेऊन ईडीच्या कार्यालयात नेलं. सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे हे राऊत यांच्या भांडुप इथल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, रविंद्र वायकर, मिलिंद नार्वेकर हेसुद्धा होते. उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.