बिग बुल राकेश झुनझुनवालाने खूप मोठे साम्राज्य मागे सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्टा झुनझुनवाला, मुले आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे. झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे ४६ हजार कोटी आहे. आता त्यांची पत्नी त्यांच्या मुलांसह साम्राज्याचा ताबा घेणार आहे.
राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भावाचे दुबईहून आगमन झाल्यानंतर काल रात्री उशिरा मुंबईतील बाणगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झुनझुनवाला यांच्या जाण्याने त्यांच्या विमान कंपनी आणि इतर व्यवसायासमोर आता मोठी आव्हाने येऊ शकतात.
गुंतवणुकदार असण्यासोबतच झुनझुनवाला हे Aptech Ltd आणि Hungama Digital Media Entertainment Pvt Ltd चे अध्यक्ष होते. बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (आय) लिमिटेड, प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, व्हाईसरॉय सिक्युरिटी लिमिटेड आणि टॉप हॉटेल लिमिटेड आदींच्या संचालक मंडळावर ते होते. सोबतच राकेश आणि त्यांच्या पत्नीची अकासा एअरमधील एकूण भागीदारी ४० टक्क्यांहून अधिक आहे. ते स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्सचे प्रवर्तक देखील आहेत. जून तिमाहीत, त्यात त्यांची हिस्सेदारी सुमारे १७.४६ टक्के होती.
राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जातात. राकेश हे देशातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांनी १९८५ मध्ये ५ हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली. त्यावेळी बीएसईचा निर्देशांक १५० वर होता. पत्नी रेखा यांच्या सांगण्यावरून त्यांनी २००३ मध्ये स्वत:ची स्टॉक ट्रेडिंग फर्म रेअर एंटरप्रायजेसची स्थापना केली.