राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूला आठवडा उलटूनही या हत्येची चर्चा काही संपत नाहीये. बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्या क्रूरपणे गोळ्या झाडल्या गेल्या, ते पाहून सर्वांचेच हृदय हेलावले. मात्र आता या खून प्रकरणातील नवे खुलासे झाल्याने लोकांना धक्का बसला आहे. मारेकऱ्यांच्या फोनमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याचा फोटोही सापडला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या मुलाचा हा फोटो आरोपींना स्नॅपचॅटच्या माध्यमातून देण्यात आला होता. कटकर्त्यांनी स्नॅपचॅटवर बाबा सिद्दीकीच्या मृत्यूची योजना आखली होती आणि या ॲपद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात होते. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने आरोपींना हे छायाचित्र पाठवले होते. शुभमच्या सांगण्यावरून आरोपींनी त्यांच्या फोनमधील सर्व चॅट आणि मेसेज डिलीट केले होते.
बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये प्रवीणने बाबा सिद्दिकीच्या मृत्यूमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे सांगितले. केवळ बाबा सिद्दीकीच नाही तर त्याचा मुलगा झीशान सिद्दीकी हेही आरोपींच्या निशाण्यावर असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.