दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आहे. या वेळी सर्वप्रथम सुरक्षा दलाने शोपियाँ जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार केले. या नंतर श्रीनगरच्या जादिबलमध्ये शोधमोहिमे दरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना टिपले.
यापूर्वी काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कराच्या लकीरपूर परिसरात लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. या दहशतवाद्याकडून एके-47 रायफलीसह इतर अनेक हत्यारे लष्कराने ताब्यात घेतली आहेत. दुसरीकडे श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त अभियान राबवत 3 दहशतवाद्यांना ठार केले. ठार करण्यात आलेले हे तीन दहशतवादी रमजानच्या काळात 20 मे या दिवशी श्रीनगरमधील पांडव चौकाजवळ बीएसएफच्या दोन जवानांच्या झालेल्या हत्येत सहभागी झाले होते.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हाती घेतलेल्या शोधमोहिमेंतर्गत छापेमारी केली. हे संयुक्त अभियान श्रीनगरच्या जादिबल परिसरात राबवण्यात आले. येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला घेरले. या बरोबरच त्यांनी या भागातून जाणार्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली. या व्यतिरिक्त आसपास राहणार्या लोकांच्या वस्त्यांमध्ये देखील या मोहिमेंतर्गत दहशतवाद्यांचा शोध घेतला गेला. याच परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हाती लागली होती. आपल्याला घेरल्याची खात्री या दहशतवाद्यांना झाल्यानंतर या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चकमक सुरू झाली. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, लष्कराने या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्यानंतर ही संयुक्त शोधमोहीम समाप्त झाली.
पोलीस आणि सुरक्षा दलाच्या निर्देशानंतर या परिसरातील इंटरनेट सेवा आणि मोबाइल सुविधा बंद करण्यात आली. इंटरनेट नेटवर्कच्या माध्यमातून दहशतवागी आपसात संवाद साधतात आणि त्याचे लक्ष्य गाठण्यात यशस्वी होतात. या व्यतिरिक्त दहशतवाद्यांना पोलीस आणि लष्कराच्या हालचालींची माहितीही मिळत असते. या कामात सीमेपलीकडे बसलेले या दहशतवाद्यांचे म्होरके त्यांना मदतही करत असतात.