उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या एका खासगी शाळेत एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण होत असल्याबाबत एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणावरून निर्माण झालेला वाद अद्याप थांबायचं नाव घेत नाही.
व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शाळेतील शिक्षिका तृप्ता त्यागी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 323 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कलमे दुखापत करणे तसंच जाणुनबुजून अपमान करणे याच्याशी संबंधित आहेत.
खतौली पोलीस ठाण्यातील अधिकारी डॉ. रवि शंकर मिश्रा यांनी याबाबत सांगितलं, “विद्यार्थ्याचे वडील इर्शाद यांच्या तक्रारीनुसार मन्सूरपूर पोलीस ठाण्यात नेहा पब्लिक स्कूलच्या संचालिका तृप्ता त्यागी यांच्याविरोधात IPC च्या कलम 323 आणि 506 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
पण जिल्हा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला असला तरी कोणत्याही एका विशिष्ट धर्माविरुद्ध टिप्पणीसंदर्भात असलेलं कलम 123 अ याचा वापर केलेला नाही.
याबाबत प्रश्न विचारला असताना पोलीस अधिकारी म्हणाले, “या प्रकरणी तपास केला जात आहे. तपासात जी काही माहिती समोर येईल. त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”
विद्यार्थ्याच्या आईचं म्हणणं काय?
या संपूर्ण प्रकरणाबाबत विद्यार्थ्याची आई रुबीना यांनी बीबीसीशी चर्चा केली. त्या म्हणतात, “मॅडमनी चुकीचं केलं आहे. मुलांकडून मारायला लावणं योग्य नाही. त्यांना मारायचंच होतं, तर स्वतः मारायचं.”
रूबीना पुढे म्हणतात, “असं वाटतं की, मॅडम मुस्लिमांविरोधात आहेत. हा सगळा प्रकार पाहता त्याचा हाच अर्थ होतो.”
तर, नेहा पब्लिक स्कूलच्या संचालिका तृप्ता त्यागी यांच्या मते, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आपल्या स्पष्टीकरणामध्ये त्या म्हणतात, “हे प्रकरण काहीच नव्हतं. पण त्याचं भांडवल करण्यात आलं आहे. मला षडयंत्र करून अडकवण्यात आलं आहे. मी कोणत्याही विद्यार्थ्याला हिंदू-मुस्लीम या दृष्टिकोनातून पाहत नाही. माझ्या शाळेत बहुतांश विद्यार्थी मुस्लीमच आहेत. मारणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही मुस्लीम विद्यार्थीही होते.”
या प्रकरणावर बोलताना विद्यार्थ्याचे वडील इर्शाद म्हणाले, “यामध्ये हिंदू-मुस्लीमचा मुद्दा नाही. फक्त मारहाणीचंच हे प्रकरण आहे. ते माझ्या मुलाला त्रास देत होते. आम्ही FIR दाखल केला आहे. आता जे काही करायचं ते पोलीस प्रशासनच करेल.”
या प्रकरणावरून लखनौचे मानवाधिकार वकील एस. एम. हैदर रिझवी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगात तक्रार दाखल केली आहे.
या फिर्यादीत त्यांनी शिक्षिका तृप्ता त्यागी यांच्यावर कलम 153 अ, 295 अ आणि 298 अंतर्गत धार्मिक आधारावर द्वेष आणि अपमानाला खतपाणी घालणं यासंदर्भातील कलमे लागू करण्याची मागणी केली आहे.
एस. एम. हैदर रिझवी म्हणतात, “मी तीन व्हीडिओ पाहिले. यामध्ये शिक्षिका मुस्लिमांविरुद्ध बोलत आहे. मुस्लीम विद्यार्थ्याला मारण्यासाठी त्या लहान मुलांना प्रवृत्त करत आहेत. तसंच त्याचं त्या समर्थनही करताना दिसतात. यामुळेच मी संबंधित आयोगांकडे तक्रार दाखल केली आहे.”
पण असं असलं तरी विद्यार्थ्याचे वडील मात्र धार्मिक आधारीवर मारहाण झाल्याचं फेटाळून लावताना दिसतात.
याविषयी रिझवी म्हणाले, “हे स्वाभाविक आहे. त्याचं कारणही स्पष्ट आहे. वडिलांचं म्हणणं ऐकलं तर सुरुवातीला त्यांना तक्रारच दाखल करायची नव्हती. पण जेव्हा हे प्रकरण चर्चेत आलं त्यावेळी प्रशासनाने त्यांच्याकडून तक्रार दाखल करून घेतली. पण ती दाखल करत असताना संबंधित कलमे लागू करण्यात आली नाहीत.
असं करणं म्हणजे द्वेष पसरवणारी वक्तव्ये अर्थात हेट स्पीचसंदर्भात सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन आहे. खरंतर या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रशासनाने स्वतःहून दखल घ्यायला हवी होती.”
मुजफ्फरनगरचे जिल्हाधिकारी अरविंद मल्लप्पा बंगारी म्हणतात, “व्हायरल व्हीडिओचा तपास पूर्ण झाला आहे. हा व्हीडिओ विद्यार्थ्याच्या चुलत भावाने व्हायरल केला होता. तपासात ज्या काही गोष्टी समोर येतील, त्यानुसारच पुढची कारवाई केली जाईल.”
विद्यार्थ्याला शाळेतून काढल्याचा आरोप
या प्रकरणानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्याचा आरोप आता शाळेवर होत आहे.
याबाबत विद्यार्थ्याची आई रुबीना म्हणाल्या, “आम्ही आमच्या मुलाला शाळेतून काढलेलं नाही. मुलाला मारहाण झाल्याची तक्रार आम्ही करायला गेलो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्या मुलाला दुसऱ्या कोणत्या तरी शाळेत घाला.”
तर, शिक्षिका तृप्ता त्यागी मुलाला काढून टाकल्याचा आरोपावर म्हणतात, “आम्ही मुलाचं नाव शाळेतून कमी केलेलं नाही. हा चुकीचा आरोप आहे. या प्रकरणात विद्यार्थ्याची सहा महिन्यांची फी परत देण्यात यावी, अशी तडजोड नातेवाईकांनी केली होती. ही अट मान्य करून आम्ही त्यांना फी परत दिली आहे.”
ही तडजोड पोलीस प्रशासनानेच केली होती, असंही त्यागी यांनी सांगितलं. पण पोलिसांनी मात्र स्वतःहून अशी तडजोड केल्याबाबत काहीही सांगितलेलं नाही.
रुबीना म्हणतात, “मॅडमनी स्वतःहून फी परत केली आहे.”
विद्यार्थ्याचे वडील इर्शाद याविषयी म्हणाले, “मॅडमनीच विद्यार्थ्यांमध्ये मारहाण घडवून आणली होती. पण आता आम्ही तडजोड केली आहे. मॅडमनी आमची फीसुद्धा परत केली. आता आम्हाला आमच्या मुलाला त्या शाळेत शिकवायचं नाही. तो अशिक्षित राहिला तरी चालेल, पण त्या शाळेत पाठवणार नाही.”
काय होतं प्रकरण?
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील मन्सूरपूर पोलीस ठाणे हद्दीतील खुब्बापूर गावात नेहा पब्लिक स्कूलमध्ये हे प्रकरण घडलं. व्हायरल व्हीडिओत दिसत असलेल्या महिला तृप्ता त्यागी याच शाळेच्या संचालिका आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या आपल्याच घरी ही शाळा चालवतात.
याच गावात राहत असलेले इर्शाद यांचा सर्वात लहान मुलगा नेहा पब्लिक स्कूलमध्ये युकेजीच्या वर्गात शिकत होता. त्याला मारहाण झाली, ते प्रकरण 24 ऑगस्ट रोजी शाळेतच घडलेलं आहे.
व्हीडिओमध्ये तृप्ता त्यागी या शाळेच्या वर्गात इर्शादला दुसऱ्या विद्यार्थ्यांकरवी मारहाण करत आहेत. तसंच यावेळी त्या मोहम्मेडियन विद्यार्थ्यांविषयी टिप्पणी करताना दिसतात.
विद्यार्थ्याचे वडील इर्शाद म्हणतात, “मॅडम दुसऱ्या मुलांकरवी माझ्या मुलाला मारहाण करायला लावतात. त्यावेळी तिथे काही कामानिमित्ताने गेलेल्या माझ्या पुतण्याने मुलाला मारहाण होताना पाहिलं, तर तत्काळ व्हीडिओ बनवून आम्हाला दाखवलं.”
इर्शाद म्हणाले, “त्यादिवशी मी सुमारे तीन वाजता शाळेत गेलो. पण मॅडमनी आपली चूक मान्य केली नाही. त्या म्हणाल्या की इथे असेच नियम आहेत. आम्ही दोन वेळा त्यांना भेटायला गेलो. तरीही त्यांनी चूक मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही हा व्हीडिओ व्हायरल केला.”
प्रकरणावरून राजकारण
हा व्हीडिओ समोर आल्यानंतर कांग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, AIMIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी, भाजप खासदार वरूण गांधी आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या नेत्यांनी भाजपच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांची परिस्थिती या विषयीवरही टिप्पणी केली.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री जयवीर सिंह यांनी म्हटलं, “शिक्षिकेविरुद्ध FIR दाखल केला आहे. तपासात दोषी आढळलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.”
तर मुजफ्फरनगरमधील खुब्बापूर गावात या प्रकरणानंतर मोठ्या घडामोडी घडल्याचं दिसून आलं. इर्शाद आणि शिक्षिका तृप्ता त्यागी या दोघांच्या घरी राजकीय नेत्यांची रेलचेल पाहायला मिळाली.
राष्ट्रीय लोक दल पक्षाचे स्थानिक आमदार चंदन सिंह इर्शाद यांच्या घरी भेट दिली. तर केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी शिक्षिका तृप्ता त्यागी यांची भेट घेतली. त्यागी समाजाचं वर्चस्व असलेल्या या गावात सुमारे 70 टक्के हिंदू नागरिक आहेत. त्याशिवाय मुस्लीम लोकसंख्याही गावात मोठ्या प्रमाणात आढळून येते.
Published By- Priya Dixit