सध्या देशात महिलांवर आणि मुलींवर लैगिक अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणारे आणखी एक प्रकरण गुजरातमध्ये समोर आले आहे. वडोदरा येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केला. हा जघन्य गुन्हा अशा वेळी घडला आहे जेव्हा राज्यात नवरात्रीच्या दिवसात देवीची स्थापना करून पूजा केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या मित्राला भेटायला गेली होती. रात्री 11 वाजता दोघेही भायली परिसरातील सनसिटी सोसायटीजवळ निर्जनस्थळी बसले असताना दोन दुचाकीवरून 5 जण आले. पाचही जण आधी आक्षेपार्ह बोलले, ज्याचा पीडितेने आणि तिच्या मित्राने विरोध केला.
त्यानंतर दुचाकीवरून आलेले दोघे जण पुढे गेले आणि उर्वरित तीन आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या मित्राला ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने स्वत:ला सांभाळत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले
घटनेनंतर पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) चे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. घटनास्थळ चिन्हांकित करून नमुने घेण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांना एक बूट आणि तुटलेला चष्माही सापडला आहे.
नवरात्रीच्या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी गुजरातमध्ये एकूण 737 'SHE टीम' तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय महिलांसाठी 100 आणि 181 हेल्पलाइन क्रमांकासह पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5,152 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कडक निगराणीसाठी 209 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून अशा दुर्दैवी घटनांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.