दारुच्या नशेत महिला सहप्रवाशावर कथित लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला बंगळुरू इथून अटक करण्यात आली आहे. पीटीआयने एएनआयच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. अटकेच्या वेळी दिल्ली पोलिसांच्या बरोबरीने बंगळुरू पोलिसांचं पथकही हजर होतं. शंकर मिश्रा असं या व्यक्तीचं नाव आहे. आरोपीला दिल्लीत आणण्यात आलं आहे.
आरोपी बहिणीच्या घरी असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी आरोपीच्या वडिलांनी मुलगा निरपराध असल्याचं म्हटलं होतं. मुलगा कुठे आहे याबाबत मात्र माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मीसुद्धा त्याच्याशी संपर्क करतो आहे. पण तो कुठे आहे मला माहिती नाही. मी सत्य सांगू इच्छितो, ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्यात तथ्य नाही असं वडिलांनी सांगितलं होतं.
शंकर मिश्रा यांच्या अटकेनंतर विमानातील कर्मचारी आणि काही सहप्रवाशांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डीसीपी रवी सिंग यांनी दिली.
पीडित महिलेसोबत प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांशी संपर्क झालाय. त्यामुळे त्यांच्याशी याबाबत चौकशी केली जाईल, असंही डीसीपी रवी सिंग यांनी सांगितलं.
तसंच, एअर इंडियाचे सीईओंनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 4 केबिन क्रू आणि एका पायलटला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना सेवेतून तात्पुरतं मुक्त करण्यात आलं आहे.
वडील काय म्हणाले होते ?
तो असं वागला असेल असं मला वाटत नाही. पीडित महिला 72 वर्षांची आहे, त्याच्या आईच्या वयाएवढी आहे. माझा मुलगा 34 वर्षांचा आहे. तो असं कसं वागू शकतो? त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला 18 वर्षांची मुलगीही आहे.
माझा मुलगा 30-35 तास झोपला नव्हता. रात्रीचं जेवण झाल्यानंतर विमानाच्या क्रूने दिलेलं ड्रिंक प्यायला असावा. मग तो झोपला असेल. मला जेवढं माहिती आहे, त्यानुसार तो जागा झाल्यानंतर एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याची विचारपूस केली होती.
पीडित महिलेने मुलाकडे नुकसानभरपाई मागितली. ती त्याने दिली. त्याच्यानंतर काय झालं माहिती नाही. त्यांनी अशी मागणी केली असेल जी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे त्या नाराज झाल्या असतील. कदाचित ब्लॅकमेलिंग केलं जात असावं.
शुक्रवारी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या वडिलांनाही चौकशीसाठी समन्स बजावला आहे. अनेकदा फोन करुनही त्यांनी उत्तर दिलं नाही. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात मुंबईत दोन लोकांची चौकशी केली.
काय होतं प्रकरण ?
26 नोव्हेंबरला एअर इंडियाचं विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत होता. या विमानात आरोपीने सहप्रवाशी महिलेवर लघुशंका केल्याचा आरोप आहे. एअर इंडियाकडे यासंदर्भात तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी बुधवारी तक्रार दाखल करुन घेतली. आरोपीने पीडितेची माफी मागून तक्रार न करण्याची विनंती केली होती. याप्रकरणाचा त्रास पत्नी आणि मुलीला होऊ नये असं आरोपीला वाटत होतं.
शुक्रवारी आरोपी ज्या कंपनीत कामाला होता त्या अमेरिकेच्या वेल्स फार्गो कंपनीने त्याला कामावरुन कमी केलं. वेल्स फार्गो ही अमेरिकास्थित आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. आरोपीवर लागलेले आरोप अस्वस्थ करणारे आहेत असं कंपनीने कारवाई करताना म्हटलं होतं.
महिला सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या पुरुष प्रवाशावर 30 दिवसांची प्रवासबंदी घातली आहे असं एअर इंडियाने स्पष्ट केलं होतं. पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत,' असे दिल्ली पोलिसांनी सांगितलं होतं.
26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवास करणाऱ्या विमानात एका विकृत मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. ही परिस्थिती हाताळण्यात कर्मचारी वर्गाकडून कसूर झाली का? हे तपासून पाहण्यासाठी अंतर्गत समितीही नेमण्यात येणार असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
'डीजीसीए'ने या घटनेबाबतचा अहवाल विमान कंपनीकडून मागविला आहे. यात निष्काळजी दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे 'डीजीसीए'ने म्हटलं आहे.
शंकर मिश्रा असं या आरोपीचं नाव असून, त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस दिल्ली पोलिसांनी जारी केली होती. आरोपीने दिलेल्या निवेदनात पीडित महिलेबरोबरच्या व्हॉट्अप संभाषणाचा दाखला दिला. मी कपडे आणि बॅग्ज साफ केल्या होत्या. पीडित महिलेनं माफ केल्याचं सांगितलं तसंच या कृत्यासाठी तक्रार नोंदवण्याचा हेतू नसल्याचं म्हटलं होतं. या संवादाचा पुरावा आरोपीने निवेदनाबरोबर जोडला आहे.
महिलेची तक्रार फक्त एअर इंडियाकडून पुरेशी नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात होती, यासाठी तिने 20 डिसेंबर रोजी तक्रार केली होती. मिश्रा यांनी 28 नोव्हेंबर रोजी पेटीएमवरुन दोन्ही पक्षांच्या सहमतीनुसार महिलेला नुकसान भरपाई दिली. याला जवळपास एक महिना उलटला. पण ही रक्कम महिलेच्या मुलीने १९ डिसेंबर रोजी परत केली होती.
या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता आणि केबिन क्रूच्या जबाबानुसार दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या समझोत्याला पुष्टी मिळाली आहे. आरोपींचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि ते तपास प्रक्रियेत सहकार्य करतील," असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे"
Published By -Smita Joshi