Ahmedabad Hit and Run Accident : गुजरातमधील अहमदाबादमध्ये सरखेज-गांधीनगर महामार्गावर (Ahmedabad Hit and Run Accident)गुरुवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. इस्कॉन ब्रिजवर झालेल्या या हिट अँड रन रोड अपघातात एक जग्वार कार लोकांवर आदळली, ज्यात एका पोलिस कॉन्स्टेबलसह 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बोताड जिल्ह्यातील सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश आहे. जग्वारचा वेग 150 किमीपेक्षा जास्त होता. या अपघातात 13 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्व जखमींना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्कॉन ब्रिजवर(Ahmedabad Iskcon Flyover Accident)गुरुवारी सकाळी आणखी एक अपघात झाला, ज्यामध्ये ट्रकने थार एसयूव्हीला धडक दिली. या अपघातानंतर चालक फरार झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. दरम्यान, भरधाव वेगात असलेली जग्वार कार पुलावर उपस्थित लोकांना तुडवत बाहेर आली. जखमींमध्ये कार चालक सत्या पटेल याचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर पोलिसांनी इस्कॉन मंदिराजवळील उड्डाणपूल तात्पुरता बंद केला.
अहमदाबाद वाहतूक पोलिसांचे एसीपी एसजे मोदी यांनी सांगितले की, या घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. जॅग्वारच्या चालकाला खासगी सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणांव्यतिरिक्त जग्वारमध्ये आणखी एक मुलगा आणि एक मुलगी प्रवास करत होते. या दोघांबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात बुधवारी रात्री 1.15 वाजता झाला.