जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला घाणेरड्या युद्धाला सामोरे जावे लागते आहे. या अशा युद्धाला नवीन मार्गांनीच सामोरे जावे लागणार आहे, असे लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी एका मुलाखतीत सांगितले. काही दिवसांपूर्वी लष्कराच्या जीपच्या समोर एका व्यक्तीला ढालीप्रमाणे बांधल्याचे त्यांनी समर्थनच केले. आंदोलकांच्या दगडफेकीचा सामना करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण मार्गाचा अवलंब आवश्यकच होता. आंदोलकांनी लष्करावर दगड फेकण्याऐवजी शस्त्रे चालवावीत, असे आव्हानही जनरल रावत यांनी दिले.
जीपला एका व्यक्तीला बांधणारे लष्करी अधिकारी मेजर लीतुल गोगोई यांच्या चौकशीनंतर त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. लष्करातील युवा अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवणे हाच या पुरस्कारामागील हेतू असल्याचे जनरल रावत यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये सध्या छुपे युद्ध खेळले जाते आहे. या अशा छुप्या युद्धाला अतिशय वाईट पद्धतीनेच हाताळावे लागते. जेंव्हा समोरासमोर युद्ध होते, तेंव्हाच त्याला युद्धाचे नियम लागू शकतात. जेंव्हा अशी छुप्या युद्धाची स्थिती असते, तेंव्हा त्याबाबत वेगळा विचार करावा लागतो. असे लष्कर प्रमुख म्हणाले. जीपला समोर एका व्यक्तीला बांधणाऱ्या मेजर गोगोई यांना लष्कर प्रमुखांचे “कोम्मेंडेशन मेडल’ देण्यात आले, यावर मानवी हक्क विषयक कार्यकर्त्यांकडून खूप टीका करण्यात आली होती. मात्र या टीकाकारांना लष्कर प्रमुखांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
जेंव्हा आंदोलक लष्करावर दगड फेकतात, पेट्रोल बॉम्ब फेकतात, तेंव्हा काय केवळ वाट बघत बसायचे का ? अशावेळी शवपेटी आणि राष्ट्रध्वजात गुंडाळण्यासाठीच जवानांनी शहिद व्हायचे का ? लष्कर प्रमुख म्हणून जवानांना मी काय सांगणे अभिप्रेत आहे? असा प्रतिप्रश्नच जनरल रावत यांनी केला.
लष्कर प्रमुख म्हणून लष्कराचे मनोधैर्य कायम अबाधित राखणे आपले काम आहे. निवडणूकीच्यावेळी जर लष्कराकडे सुरक्षितता मागितली असेल. तर ती मेजर गोगोई नाकारू शकले नसते. अनंतनागमध्येही अशाच प्रकारे निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र लष्कराच्या सुरक्षिततेसाठी काय ? लष्कराला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी उपाय शोधणे क्रमप्राप्त आहे. जर आंदोलकांनी दगडफेकीऐवजी शस्त्रे चालवली, तर लष्कराला त्यांचा सामना करणे सोपे जाईल. आंदोलकांनी खरोखरच गोळ्या झाडाव्यात, म्हणजे लष्करही त्यांना तशाच गोळीबाराने उत्तर देता येऊ शकेल, असे जनरल रावत म्हणाले. मात्र त्याच बरोबर जम्मू काश्मीरमध्ये लष्कराकडून जास्तीत जास्त संयमही बाळगला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.