अरुणाचल प्रदेशातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथील डोंगराळ भागात हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू झाला. लष्कराने मंगळवारी याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच हे सैनिक बर्फाखाली गाडले गेल्याची चर्चा होती. यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र बचाव पथकाला जवानांचे मृतदेह सापडले.
हिमस्खलनाची घटना राज्यातील कामेंग सेक्टरच्या उच्च उंचीच्या भागात घडली. बेपत्ता जवान रविवारी लष्कराच्या गस्तीचा भाग होते. त्यानंतर त्यांना हिमस्खलनाचा तडाखा बसला. त्यांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक विमानाने घटनास्थळी पाठवण्यात आले, जेणेकरून बचाव कार्यात त्यांची मदत घेता येईल. मात्र, परिसरातील खराब हवामानामुळे पथकाचे शोधकाम कठीण झाले. या संपूर्ण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे.