भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या टप्प्यासाठी 20 ऑगस्ट रोजी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल, तर नामांकनाची अंतिम तारीख 27 ऑगस्ट असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट असेल. 18 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी गॅझेट अधिसूचना 29 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर नामांकनाची अंतिम तारीख 5 सप्टेंबर असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर असेल. 25 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यासाठी गॅझेट अधिसूचना 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर नामांकनाची अंतिम तारीख 12 सप्टेंबर असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर आहे. 1 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी 74 जागा सर्वसाधारण असून उर्वरित जागा राखीव आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार आहेत..71 लाख लोक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.