अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज तहकूब केली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2019 मध्ये होईल असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. मात्र पुढील वर्षी कधी सुनावणी घेण्यात येईल यासंबंधीची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
सरन्यायाधिश रंजन गोगोई, एस. के. कौल आणि न्या. के. एम जोसेफ यांच्या खंडपीठाने या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी केली.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात सन 2010 मध्ये निकाल दिला असून त्यांनी अयोध्येतील भूमी तीन वादींमध्ये विभागून देण्याचा निर्णय दिला आहे त्याला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहेत. त्याच्या सुनावणीच्या संबंधातील वेळापत्रक आजच्या सुनावणीच्यावेळी निश्चित होणार होते.
अयोध्येतील वादग्रस्त ठरलेली 2.77 एकर जागा अलाहाबाद उच्च न्यायालयाने राम लल्ला, सुन्नी वक्फ बोर्ड, आणि निर्मोही आखाडा याना समप्रमाणात विभागून दिली आहे. या निकालाने गर्भगृहाच्या ठिकाणी जिथे आज रामल्ललाची मुर्ती विराजमान आहे तेथे मंदिर उभारणीला अनुमती मिळाली आहे. पण सुन्नी वक्फ बोर्ड तसेच बाबरी मशिद कृती समितीच्यावतीने या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. ही सुनावणी गेली सुमारे आठ वर्ष प्रलंबीत आहे.
27 सप्टेंबर रोजी तत्कालिन सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीच्या संबंधातील अडथळे दूर करीत त्याच्या सलग सुनावणीला वाव दिला आहे.