सध्या भाजप आणि शिवसेनेचे राजकीय संबंध चांगले नसले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नवे नाते निर्माण होणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील हिचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांच्यासोबत निश्चित झाला आहे. 28 डिसेंबरला मुंबईतील एका हॉटेलमध्ये हा हायप्रोफाईल विवाहसोहळा पार पडणार आहे, ज्यामध्ये काही खास लोकच उपस्थित राहणार आहेत. अंकिता पाटील सध्या काँग्रेसमध्ये असून त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. याशिवाय त्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या संचालकही आहेत.
अंकिताचे वडील हर्षवर्धन पाटील हेही बराच काळ काँग्रेसमध्ये होते, पण त्यांनी पक्षापासून फारकत घेतली आणि २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. अंकिता पाटीलचा नवरा असणार्या निहार ठाकरेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत पुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे ते पुत्र आहेत. 1996 मध्ये बिंदुमाध्वचा अपघाती मृत्यू झाला. बिंदुमाधव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू होते. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत आणि मुंबईतच राहतात. या लग्नात ठाकरे कुटुंब जमण्याची शक्यता आहे. मंगळवारी भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे निमंत्रण देण्यासाठी स्वत: राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले.