अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा जेव्हा परत आले तेव्हा भारतात लोक त्यांना विचारायचे की अंतराळात त्यांना देव भेटला का?
त्यावर ते म्हणायचे, “नाही मला तिथे देव दिसले नाहीत.” राकेश शर्मा 1984 मध्ये अंतराळात गेले होते.
त्यांच्या अंतराळ यात्रेला तीन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आता त्यांना भेटणारे त्याचे प्रशंसक वास्तव आणि कल्पना यांच्यातला काय फरक आहे ते जाणून घेताहेत.
ते सांगतात, “आता माझ्याकडे येणाऱ्या अनेक महिला त्यांच्या मुलांशी माझी ओळख करून देताना सांगतात की हे काका चंद्रावर गेले होते.”
अंतराळातून आल्यावर एक वर्षांपर्यंत राकेश शर्मांना त्यांच्या चाहत्यांचा गराडा असायचा. ते कायम कुठे ना कुठे जात असायचे. हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये थांबायचे.
वेगवेगळ्या समारंभात चाहते त्यांच्याबरोबर फोटो काढायचे, ते भाषण देत असत.
चाहते त्यांचे कपडेच फाडायचे
त्यांना ज्येष्ठ नागरिक महिला दुवा देत असत. ऑटोग्राफ घेण्यासाठी ओरडत असत. नेते त्यांना मतं मिळावे म्हणून विविध सभांना घेऊन जात असत.
जुन्या दिवसाची आठवण करताना ते सांगतात, “ती एक वेगळीच भावना होती. चाहत्यांच्या प्रेमाने मी खरोखर थकून गेलो होतो. मला सतत हसावं लागायचं.”
राकेश शर्मा 21 वर्षांचे असताना भारतीय वायू सेनेत होते. तिथे ते सुपरसॉनिक फायटर जेट विमान उडवायचे.
पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 1971 च्या युद्धात त्यांनी 21 वेळा उड्डाण केलं होतं. त्यावेळी ते 23 वर्षांचेही नव्हते.
25 वर्षाच्या वयात ते वायुदलातले सर्वोत्तम पायलट होते. वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी अंतराळात पाऊल टाकलं होतं. असं करणारे ते 128 वे व्यक्ती होते.
राकेश शर्मांनी जेव्हा हा पराक्रम केला ते वर्षं भारतासाठी खरंतर सगळ्यांत वाईट वर्षं होतं. ही गोष्ट सोयीस्करपणे विसरली गेली होती.
त्याचवर्षी ऑपरेशन ब्लू स्टार झालं होतं. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधींची हत्या झाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात शीखविरोधी दंगली झाल्या होत्या.
त्याचवर्षी भोपाळ गॅस दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. देशातल्या सगळ्यांत दु:खद घटनांपैकी ती एक होती.
अंतराळात जाण्याआधी प्रचंड मेहनत
इंदिरा गांधी यांनी 1984 च्या आधी अंतराळातील विविध प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यासाठी त्या रशियाची मदत घेत होत्या.
राकेश शर्मा यांची 50 फायटर पायलटांमधून चाचणी घेतल्यानंतर निवड केली होती. त्यांच्या शिवाय रवीश मल्होत्रा सुद्धा या चाचणीत निवडले गेले होते आणि त्यांना रशियाला प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं.
अंतराळात जाण्यासाठी एक वर्षं राकेश शर्मा आणि रवीश मल्होत्रा स्टार सिटीला गेले होते. ते मॉस्कोहून 70 किमी दूर होतं आणि अंतराळवीरांचं प्रशिक्षण केंद्र होतं.
राकेश त्या प्रसंगाची आठवण करताना सांगतात, “तिथे खूप थंडी होती. आम्हाला बर्फातून एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत पायी जावं लागायचं.”
रशियन भाषा लवकरात लवकर शिकण्याचं आवाहन त्यांच्यासमोर होतं. कारण बहुतांश प्रशिक्षण रशियन भाषेतूनच होणार होतं. दरदिवशी ते सहा ते सात तास रशियन भाषा शिकायचे. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना तीन महिन्यात रशियन भाषा ठीकठाक यायला लागली होती.
राकेश शर्मा यांचा नम्र स्वभाव
त्यांच्या खाण्यापिण्यावरही लक्ष ठेवलं जायचं. ऑलिम्पिक ट्रेनर त्यांच्या स्टॅमिना, वेग आणि ताकदीवर नजर ठेवून असायचे आणि त्यांना प्रशिक्षण द्यायचे.
प्रशिक्षणादरम्यान मला सांगितलं की माझी निवड झाली आहे आणि रवीश मल्होत्रा बॅकअप म्हणून असतील.
राकेश शर्मा म्हणतात, “ खरंतर हे फार कठीण नव्हतं.”
मात्र विज्ञानावर लिहिणारे लेखक पल्लव बागला यांच्या मते राकेश शर्मा यांची ही मोठी उडी आहे.
ते लिहितात, “ते एका अशा देशाचं प्रतिनिधित्व करायचे ज्यांचा कोणताच अंतराळ कार्यक्रम नव्हता. त्यांनी कधीच अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. मात्र त्यांनी विपरीत परिस्थितीत जाऊन दुसऱ्या देशात कठोर प्रशिक्षण मिळवलं. नवीन भाषा शिकली. ते खरंच हिरो आहेत.”
अंतराळात जाण्याचा तो बोरिंग दिवस
3 एप्रिल 1984 ला सोव्हिएतच्या एका रॉकेटमध्ये राकेश शर्मा आणि दोन रशियन अंतराळवीर, युरी माल्याशेव आणि गेनाडी सट्रेकालोव्ह अंतराळात गेले होते.
त्यावेळच्या सोव्हिएत रिपब्लिक ऑफ कजाकस्तानच्या अंतराळ केंद्रातून ते रवाना झाले होते.
राकेश शर्मा तो क्षण आठवून सांगतात, “जेव्हा आम्ही रवाना होत होतो तो अतिशय कंटाळवाणा दिवस होता. तो अतिशय बोरिंग दिवस होता. कारण आम्हाला इतका अभ्यास करायला लावला होता की तो आमच्या दिनचर्येचा भाग झाला होता.”
जेव्हा मी विचारलं की पृथ्वीवरून अंतराळात जाताना काळजीत होते का? त्यावर ते म्हणाले,
“मी अंतराळात जाणारा 128 वी व्यक्ती होतो. 127 लोक जिवंत परत आले होतो. त्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नव्हतं.”
या मिशनमुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दृढ झाले अशा बातम्या प्रसारमाध्यमात आल्या होत्या.
राकेश शर्मा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या अंतराळवीरांनी तिथे आठ दिवस व्यतित केले.
सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
अंतराळात योगाभ्यास करणारे राकेश शर्मा हे पहिले होत. त्यामुळे गुरुत्वाचा परिणाम कमी होतो का हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.
त्यांनी सांगितलं, “हे फार कठीण होतं. तुमच्या पायाखाली कोणतंच वजन जाणवत नाही. तुम्ही कायम हवेत तरंगत राहता. त्यासाठी काहीतरी उपाययजोना करणं आवश्यक होतं.
जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना विचारलं की अंतराळातून भारत कसा दिसतोय तेव्हा ते म्हणाले होते, “सारे जहां से अच्छा.”
राकेश शर्मा सांगतात, “मला चांगलं आठवतं. त्यात कोणत्याच प्रकारचा देशभक्तीचा उन्माद नव्हता. खरोखर अंतराळातून भारत मनमोहक दिसत होता.”
न्यूयॉर्क टाइम्सने तेव्हा लिहिलं होतं की बऱ्याच काळात भारताचा स्वत:चा अंतराळ प्रवास होणार नाही. बऱ्याच काळापर्यंत राकेश शर्मा अंतराळात जाणारे एकमेव भारतीय असतील.
अंतराळातून परत आल्यावर
राकेश शर्मा यांनी अंतराळातून आल्यावर जेटचे पायलट म्हणून त्यांचं आयुष्य सुरू केलं.
त्यांनी जग्वार आणि तेजस विमान उडवलं. बोस्टनच्या एका कंपनीत ते चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम केलं. ती विमान, रणगाडे आणि पाणबुड्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करायची.
त्यांना पुन्हा अंतराळात जावंसं वाटतं का?
निवृत्त झाल्यावर राकेश शर्मांनी घर बांधलं. या घराचं छत तिरकं आहे. बाथरुममध्ये सोलर हिटर लागलेत. तिथे पावसाचं पाणी जमा होतं.
ते त्यांची पत्नी मधू यांच्याबरोबर राहतात. त्यांच्यावर बायोपिक तयार होण्याची चर्चा आहे.
मी त्यांना शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्हाला पुन्हा अंतराळात जायला आवडेल का?”
बाल्कनीतून बाहेर पाहत ते म्हणाले, “मला अंतराळात पुन्हा जायला आवडेल. मात्र यावेळी मला पर्यटक म्हणून जायला आवडेल. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा आमच्याकडे फारच काम होतं.”
(हा लेख 2017 साली बीबीसीवर प्रकाशित झाला होता. आज चंद्रयान मोहिमेच्या निमित्ताने तो पुन्हा प्रकाशित करत आहोत.)