न्यायमूर्ती उदय उमेश लळित हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. लळित हे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रवासियांसाठी ही एक अभिमानाी बाब असणार आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून लळित यांच्या नावाची शिफारस केली आहे.
न्यायमूर्ती लळित हे भारताचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. एन व्ही रमणा या महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत, त्यानंतर लळित हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. ज्येष्ठतेच्या आदेशानुसार न्यायमूर्ती लळित हे सरन्यायाधीश होण्याचे दावेदार होते. न्यायमूर्ती लळित हे तिहेरी तलाकसारखे महत्त्वाचे निर्णय देणार्या खंडपीठाचा एक भाग आहेत ज्याचा देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
न्यायमूर्ती लळित हे देशातील दुसरे सरन्यायाधीश असतील, जे बार कौन्सिलमधून न्यायाधीश बनले आणि नंतर त्यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली. यापूर्वी हे मार्च १९६४ मध्ये घडले होते. तेव्हा न्यायमूर्ती एस एम सिक्री यांना बार कौन्सिलमधून न्यायाधीश होण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते १९७१ मध्ये सरन्यायाधीश देखील झाले.
न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती लळित दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती लळित हे देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक आहेत आणि त्यांची १३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा भाग आहेत.