Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोव्हिड डेटा लीक होण्याचे दावे; सरकार म्हणतं

cowin app
, सोमवार, 12 जून 2023 (23:25 IST)
भारतात कोव्हिड लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या लाखो लोकांचा डेटा कथितरित्या लीक झाला आहे.
 
राजकीय नेत्यांसह अनेक प्रसिद्ध लोकांचे पासपोर्ट क्रमांक, ओळखपत्र क्रमांक तसंच वाढदिवस आणि फोन नंबरसारखी माहिती टेलिग्राम अॅपवर उपलब्ध आहे, असा दावा केला जातोय. असंही म्हटलं जातंय की टेलिग्राम अॅपवर कोणाचीही माहिती टाकून त्यांच्यासंबंधी माहिती पाहाता येऊ शकते.
 
ट्विटरवर अनेकांनी स्क्रीनशॉट शेअर करून असा दावा केलाय की ते अनेक प्रसिद्ध लोकांची माहिती पाहू शकतात.
 
पण सरकारने हे दावे खोडून काढले आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की कोविन प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांच्यामते, “या बातम्या बिनबुडाच्या आहेत आणि चुकीच्या उद्देशाने दिलेल्या आहेत.”
 
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी अनेक स्क्रीनशॉट शेअर करून दावा केला की राज्यसभेचे खासदार डेरिक ओब्रायन, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि केसी वेणुगोपाल, तसंच राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह, राज्यसभेचे खासदार सुश्मित देव, अभिषेक मनु सिंघवी आणि संजय राऊत यांसारख्या अनेक नेत्यांची माहिती फुकटात उपलब्ध आहे.
 
याशिवाय त्यांनी दावा केला की पत्रकार राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, धन्या राजेंद्रन आणि राहुल शिवशंकर यांची खाजगी माहितीही उपलब्ध आहे.
 
त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की, “गृह मंत्रालयासह, मोदी सरकारला या डेटा ब्रीच प्रकरणाची काहीही माहिती नाही का?
 
“लोकांची महत्त्वाची माहिती जसं की पासपोर्ट नंबर, फोन नंबर, आधार नंबर लीक झालेले आहेत. हा राष्ट्रीय चिंतेची बाब आहे.”
 
गोखले यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे करत लिहिलं की, “पंतप्रधान मोदी कुठवर अश्विनी वैष्णव यांची अकार्यक्षमता लपवत राहाणार.”
 
विरोधी पक्षाचे प्रश्न
सीपीआयम नेते सीताराम येचुरी यांनी सरकारला म्हटलं की या डेटा लीकच्या मागे ज्या लोकांचा हात आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी.
 
त्यांनी असंही म्हटलं की हे सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे ज्यात म्हटलं की खाजगीपणा हा मुलभूत अधिकार आहे.
त्यांच्या पक्षाने एक पत्रक जाहीर करून म्हटलं की, “आरोग्य मंत्रालयाने जून 2021 मध्ये अशा आरोपांचा इन्कार केला होता पण कोविन सिस्टिमच्या कथित लीकवरून कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला तपासाचे आदेश दिले होते. या तपासात काय निष्पन्न झालं याची माहिती अजूनही लोकांना दिलेली नाही.”
 
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, “जर या बातम्या खऱ्या असतील तर सरकारने ताबडतोब याबद्दल स्पष्टीकरण द्यावं. तसंच या डेटा लीकला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात यावी.”
 
टेलिग्राम अॅपवर माहिती लीक झाली असं म्हटलं जातंय
 
त्यांनी लिहिलं, “एक नागरिक म्हणून आपली माहिती वेगवेगळ्या सरकारी पोर्टलवर देत असतो. सरकारने आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पावलं उचलायला हवेत, हे अतिशय आवश्यक आहे. आपल्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन व्हायला नको.”
 
“सरकारने डेटा संरक्षणासाठी कडक कायदे बनवण्याची वेळ आली आहे. आम्ही कारवाई आणि पारदर्शीपणाची मागणी करत आहोत. आपला खाजगी डेटा कोणाच्याही हाती लागता कामा नये.”
सरकारने म्हटलं कोणताही डेटा लीक नाही
सरकारकडून एक पत्रक जाहीर करून त्यात म्हटलंय की कोविन प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित आहे.
 
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “डेटा गोपनीय ठेवण्यासाठी पुरेसे सुरक्षेचे उपाय योजण्यात आलेले आहेत. आरोग्य मंत्रालयाचं कोविन पोर्टल पूर्णपणे सुरक्षित आहे. याशिवाय वेब अॅप्लिकेशन, फायरवॉल, अँटी डीडीओएस, एसएसएल/टीएलएस, नियमित मुल्यांकन, ओळख आणि अॅक्सेस मॅनेजमेंट यासारखे सुरक्षेचे उपाय कोविन पोर्टलसाठी योजण्यात आलेले आहेत. डेटासाठी फक्त ओटीपी आधारित अॅक्सेस दिला जातो. कोविन पोर्टल पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी सगळी पावलं उचलली गेली आहेत आणि उचलली जात आहेत.”
 
“या ओटीपीशिवाय लस घेणाऱ्यांचा डेटा शेअर केला जाऊ शकत नाही. प्रौढांच्या लसीकरणात फक्त त्यांच्या जन्मवर्षाची माहिती घेतली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार बॉट जन्मतारीख सांगतोय. ज्यांनी लस घेतली आहे त्यांच्याकडून त्यांचा पत्ता मागितलेला नाही
 
याआधीही सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या आधी 2021 साली दावा केला गेला होता की कोविन पोर्टलवरून कोट्यवधी लोकांचा डेटा लीक झाला आहे. सन 2022 मध्येही दावा केला गेला की कोव्हिडची लस घेणाऱ्या लोकांचा डेटा लीक झाला आहे.
 
वृत्तसंस्था पीटीआयनुसार रेड फोरम वेबसाईटवर एका सायबर गुन्हेगाराने दावा केला होता की त्यांच्याकडे 20 हजाराहून जास्त लोकांचा डेटा आहे.
 
जानेवारी 2022 मध्ये नॅशनल हेल्थ ऑथोरिटीचे मुख्याधिकारी आरएस शर्मा यांनी म्हटलं होतं की, “कोविन एक अत्याधुनिक, सुरक्षित यंत्रणा आहे आणि यात कधीही सिक्युरिटी ब्रीच होऊ शकत नाही. कोविनवर आपल्या नागरिकांचा डेटा एकदम सुरक्षित आहे. यावरून डेटा लीक झाल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.”


Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

India Tour of WI: भारताच्या वेस्ट इंडिज दौर्‍याचे पूर्ण वेळापत्रक, टीम इंडिया दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार