Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मिचाँग चक्रीवादळ : चक्रीवादळांची नावं नेमकी कशी ठेवली जातात?

Cyclone Biporjoy Effect
, रविवार, 3 डिसेंबर 2023 (21:02 IST)
Cyclone Michong :बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालं असून त्याला 'मिचाँग' हे नाव देण्यात आलं आहे.चार डिसेंबरच्या आसपास हे वादळ तामिळनाडू राज्याच्या किनाऱ्यावर चेन्नई आणि मछलीपट्टनम शहरांदरम्यान किनाऱ्यावर धडकेल. त्यामुळे तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रावर या वादळाचा थेट परिणाम होणार नाही, मात्र वादळामुळे राज्यात काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
 
मिचाँग चक्रीवादळ हे 2023 या वर्षातलं उत्तर हिंदी महासागरातलं सहावं आणि बंगालच्या उपसागरात आलेलं चौथं चक्रीवादळ आहे.
 
हे नाव म्यानमारनं सुचवलं असून त्याचा अर्थ होतो शक्ती, कणखरता.
 
पण या चक्रीवादळाला मिचाँग हे नाव का देण्यात आलं, जाणून घ्या.
 
चक्रीवादळांना नाव का दिलं जातं?
सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नावं वापरणं सोपं जातं, म्हणून वादळांना नावं देण्याचा प्रघात पडला.
 
तसंच वादळ नेमकं कुठे आहे, यावरून ते हरिकेन आहे की टायफून की सायक्लोन, म्हणजे चक्रीवादळ हे ठरतं.
 
वादळांना नावं देण्याची पद्धत तशी जुनी आहे, पण भारतात अलीकडेच वादळांना अशी नावं देण्याची पद्धत सुरू झाली.
 
अगदी सोळाव्या शतकातही प्युर्टो रिकोमध्ये आलेल्या वादळाला सेंट फ्रांसिस यांचं नाव दिल्याचे उल्लेख आहेत.
 
19व्या शतकातले हवामानतज्ज्ञ क्लेमेंट व्रॅग ऑस्ट्रेलियात राहायला गेले, तेव्हा तिथे येणाऱ्या वादळांना नावं देण्यास सुरुवात केली होती.
 
1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजे वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) या संस्था उष्णकटीबंधीय चक्रीवादळांना नावं देत आले आहेत.
 
चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं?
डब्ल्यूएमओ ही जिनिवास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे.
 
त्यानुसार एखाद्या प्रदेशातील विविध देश त्यांच्यातर्फे नावं सुचवतात आणि विशिष्ठ क्रमानं त्याच नावांमधून चक्रीवादळाला नावं दिलं जातं.
 
हिंदी महासागराच्या दक्षिण भागातील चक्रीवादळांना नावं देण्यास 1960 च्या दशकातच सुरुवात झाली होती. पण उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावं देण्याची पद्धत 2004 सालापर्यंत सुरू झाली नाही.
 
कारण या वादळांची नावं ठेवणं एक वादग्रस्त काम होतं.
 
भारतातले ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. एम महापात्रा सांगतात की धार्मिक, जातीय विविधता असणाऱ्या या प्रदेशात एखाद्या नावामुळे लोकांच्या भावना दुखावू नयेत यासाठी त्यांना नावं देण्यात आली नाहीत.
 
वर्ष 2004 मध्ये डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेलऐवजी संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवण्याची पद्धत सुरू झाली.
 
यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली.
 
त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात. प्रत्येक देशाच्या अद्याक्षरानुसार नावांचा क्रम लावण्यात आला आहे.
 
नावं लहान असावं, ते समजण्यासारखे असावं, ते सांस्कृतीकदृष्ट्या संवेदनशील आणि भडकाऊ असू नये ही अट ठेवून भारत सरकार नावं मागवते.
 
चक्रीवादळांना नावं कोण देतं?
उत्तर हिंदी महासागरातील एखाद्या वादळानं काही निकष गाठले, जसं की कमीतकमी ताशी 63 किमी वेगानं वारे वाहात असतील तर त्याला चक्रीवादळाचा दर्जा आणि नाव दिलं जातं.
 
नवी दिल्लीत भारतीय हवामान विभागाअंतर्गत येणारं रिजनल स्पेशलाईझ्ड मेटरॉलॉजिकल सेंटर ही नावं देण्याचं काम करतं.
2004 साली उत्तर हिंदी महासागरातील देशांनी तयार केलेली नावांची सूची 2020 सालच्या अंफन चक्रीवादळासोबत संपली. त्यानंतर नव्या सूचीतून निसर्ग चक्रीवादळाला नाव देण्यात आलं.
 
चक्रीवादळासंदर्भातील पॅनल दरवर्षी एकत्र येऊन चर्चा करतं आणि गरज पडली तर सूचीमध्ये बदल करतं.
 
चक्रीवादळांच्या नावावरून वाद
या 64 नावांच्या यादीमुळे कधी वाद झालाच नाही असं नाही.
 
2013मध्ये श्रीलंकेने महासेन नावाला श्रीलंकेतील राष्ट्रवादी विचारांचे लोक आणि अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर त्या वादळाला वियारू नाव देण्यात आलं.
 
महासेन राजानं श्रीलंकेत शांतता आणि समृद्धीचं युग आणलं असं त्यांचं मत होतं. त्यामुळे अशा आपत्तीला त्यांचं नाव देणं त्यांना चुकीचं वाटलं.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CSK : माजी भारतीय यष्टीरक्षकाचा मोठा दावा,धोनीच्या जागी ऋषभ पंत CSK कर्णधारपदी!