राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना समन्स बजावला आहे.
आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.