"तुम्ही या मृतदेहांचं काय करता?" हे वाक्य वाचून एखाद्याला हा काय प्रकार आहे असं वाटू शकतं. पण असे प्रश्न वारूला नेहमीच विचारले जातात. एम.कॉम.चं शिक्षण घेतलेली वारू जवळपास दीड वर्षांपासून शवागृहात काम करते.
अनेकदा पुरुषच शवविच्छेदन करण्याचं काम करतात. अशा क्षेत्रात काम करणारी स्त्री मिळणं तसं दुर्मिळच. पण वारू या क्षेत्रात काम करते आहे. ती हे काम कसं करू लागली? तिची नेमकी गोष्ट काय आहे? सध्या वारू प्रसूती रजेवर आहे. बीबीसीने तिची भेट घेऊन या सर्व बाबींचा उलगडा केला.
प्रदात्तूर सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टम अटेंडंट म्हणून काम करणारी वारू तिचं पूर्ण नाव पगडाला वरतु असल्याचं सांगते. आज ती 24 वर्षांची असून कडपझिलाच्या चापडू मंडळातील चिन्नवरदयापल्ले इथे राहते.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, आत्महत्या केलेल्या आणि खून झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेले जातात. त्या मृतदेहांचे तुकडे करणे आणि अवयव बाहेर काढणे हे काम वारू करते.
वारू सांगते, "माझ्यावर घराची जबाबदारी असल्याने मी या नोकरीत आले. माझं माध्यमिक शिक्षण प्रदात्तूर मध्ये आणि एम.कॉम तिरुपतीमध्ये झालं. माझे वडील मेंढपाळ होते. आई घरीच असते. पूर्वी मी एका खाजगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते."
मागच्या वर्षीच माझं लग्न झालं. पोस्टमार्टम अटेंडंटची नोकरीची जाहिरात पाहिल्यावर मी नोकरीसाठी अर्ज केला. त्यांना मी मुलगी असल्यामुळे पेपर वर्क होईल का? असं विचारलं. मला त्याआधी शवविच्छेदन करावं लागेल हे माहीत नव्हतं.
फक्त ही नोकरीच नाही तर मी इतर नोकऱ्या देखील पाहिल्या. पण मिळणारा पगार कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा नव्हता. ही सरकारी नोकरी होती. भविष्यात पगार वाढून नोकरीत कायम होता येईल या आशेने मी इथे रुजू झाले. सध्या माझी नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात केली आहे.
पहिल्याच दिवशी तीन मृतदेह
आधी मला मृतदेहांची भीती वाटायची. माझे वडील म्हणायचे की, जर आपण मृतदेहांच्या सहवासात राहिलो तर त्यांचे भटकणारे आत्मे आपल्याला त्रास देतात. त्यामुळे मी कधीच मृतदेहाजवळ गेले नाही. पण नोकरीच्या पहिल्याच दिवशी मला तीन मृतदेह बघावे लागले. डॉक्टरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं विच्छेदन करावं लागलं.
शवविच्छेदन कसं करतात हे आतापर्यंत मला माहित नव्हतं. पहिला दिवस खूप भीतीदायक होता. डॉक्टर म्हणाले की, मी जसं करतोय तसं करा. हेच काम करण्यासाठी तुमची नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून मी भीती सोडली आणि हे काम करू लागले.
जेव्हा मी स्वतःहून एका मृतदेहाचं विच्छेदन केलं तेव्हा रात्रंदिवस माझ्या डोक्यात तेच यायचं. डोकं फोडणे, शरीराचे अवयव बाहेर काढणे अशा गोष्टी स्वप्नात येऊ लागल्या. ती सगळी प्रक्रिया करायला मला आधी भीती वाटत होती. त्यानंतर हळूहळू सवय झाली.
आयुष्याचा तिरस्कार
पण हे काम सोपं नाही. कधीकधी जीवनाचा तिटकारा येतो. काही मृतदेह बघून पोटात गोळा येतो. कधीकधी कुजलेले मृतदेहही येतात. त्यांचा वास येऊन मळमळ होते.
सुरुवातीला वाटायचं की कर्म कसं असतं? ते काय म्हणून जगले असतील आणि आता त्यांना असं मरण आलं असावं.
विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास लावून घेणे, कोणत्याही छोट्या मोठ्या कारणासाठी ट्रेनखाली उडी मारणे. अशा कोणत्याही कारणासाठी लोक जीव देतात.
अगदी छोट्या गोष्टीही माणसाचा जीव घेतात. त्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असतात. असं वाटतं की त्यांच्याशी बसून बोललो असतो तर त्यांनी जीव दिला नसता.
तेव्हा खूप वाईट वाटतं
शवविच्छेदन करताना पाहून खूप भीती वाटते. लोक म्हणतात की, शवविच्छेदन करणारे लोक दारू पितात. या नोकरीसाठी पदव्युत्तर पदवीची गरज नसते. ही मुलगी मृतदेहाच्या ठिकाणी कामाला जाते असं म्हणत लोक नावं ठेवतात, आम्हाला हात लावून घेत नाहीत, नाहीतर त्यांना देव पावणार नाही असं त्यांना वाटतं.
मी शवविच्छेदन करते म्हणून लोक माझ्याकडे बघत नाहीत. पण एक डॉक्टर देखील तेच करतो! मी पण तेच काम केलं तर त्यात माझी काय चूक आहे? सुरुवातीला लोकांचे टोमणे ऐकून मला वाईट वाटलं, पण नंतर मला सवय झाली. मी माझं काम करते आहे. त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलावं.
जिवंत माणसापेक्षा मृतदेह बरे
खरं तर आता मृतदेहापेक्षा जिवंत माणसांचीच भीती वाटते. पूर्वी घरी एकटीने झोपायला भीती वाटत होती. आता मी थेट मृतदेहाजवळ जाते. ते आपल्याला काही त्रास देत नाहीत.
काहीजण म्हणतात की, गरोदर महिलांनी शवविच्छेदन कक्षाच्या जवळ, मृतदेहाजवळ जाऊ नये. पण हे माझं काम आहे.
काही मृतदेहांना त्यांचे नातेवाईक हातही लावत नाहीत.
महिन्याला 25 मृतदेह येतात. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन कर्मचारी काम करतात. रविवारीही काम असतं, पण तुम्ही आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेऊ शकता.
पतीकडून मिळालं प्रोत्साहन
पोस्टमार्टम अटेंडंटच्या नोकरीत रुजू झालेल्या वारूला पती बलय्या आणि सासरच्या मंडळींचाही चांगला पाठिंबा मिळत आहे.
बलय्या म्हणतात, "मी तिला कोणाचीही काळजी करू नकोस असं सांगितलं होतं. माणूस जिवंत असताना डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात. आणि मेल्यावर त्यांचं शवविच्छेदन केलं जातं. फरक एवढाच आहे. सुरुवातीला मला थोडी भीती वाटली पण आता काही वाटत नाही. मी एमबीए केलंय. नोकरी म्हणजे काय असतं हे मला माहिती आहे. बाईने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम करावं असं मला वाटतं."
"आम्ही सुरुवातीला साशंक होतो"
ही मुलगी हे काम कसं करू शकते, याबद्दल सुरुवातीला शंका घेणारे डॉक्टरही आता तिचं काम पाहून थक्क झाले आहेत.
वारू तिचं काम अतिशय धाडसाने करत असल्याचं प्रदात्तूर जिल्हा वैद्यकीय अधीक्षक आनंद बाबू यांनी सांगितलं. ते तिचं कौतुक करत होते.
आनंद बाबू म्हणतात, "वारू आता वैद्यकीय रजेवर आहे. दीड वर्षापासून ती हे काम करते आहे. पूर्वी अनुदीप नावाचा फॉरेन्सिक तज्ञ होता. त्याने तिला चांगलं प्रशिक्षण दिलंय. ती स्वतः मृतदेह कापून त्यांचे अवयव काढते. आणि ती हे न घाबरता धैर्याने करते. शवविच्छेदनाच्या कामासाठी सहसा महिला येत नाहीत, फक्त पुरुष येतात. ते दारूही पितात. पण कुजलेल्या शरीराचंही विच्छेदन वारूने अगदी धाडसाने केलं आहे."
Published By- Priya Dixit