राजस्थानातील जयपूरमधील दुडू शहरात एका विहिरीतून एकाच वेळी पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह तीन महिला आणि त्यांच्या दोन मुलांचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही बहिणींचा विवाह एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांशी झाला होता. त्याचवेळी मृत्यूसमयी दोन्ही तिन्ही बहिणी गरोदर असल्याचंही समोर आलं आहे. सासरच्या घरात भांडण झाल्यानंतर तिन्ही बहिणी पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. एएसपी दिनेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, तिन्ही बहिणी तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
माहितीनुसार कालू मीना 25, ममता मीना 23 आणि कमलेश मीना 20 अशी तीन बहिणींची नावे आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्यांच्यासोबत मारल्या गेलेल्या मुलांपैकी एक चार वर्षांचा तर दुसरा एक महिन्यापेक्षा कमी वयाचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तिघांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये तीन बहिणींच्या वडिलांनी सांगितले की, सासरच्या घरात हुंड्यासाठी छळ केला जात होता. वडिलांनी असेही सांगितले की 25 मे रोजी त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांना फोन केला होता. या तिघांनाही तिचा पती आणि इतर नातेवाईक मारहाण करत असल्याचे तिने सांगितले होते. यासोबतच त्याच्या जीवालाही धोका होता.