देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात पुढील दोन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की भारतात अजूनही कोरोना विषाणूची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ते म्हणाले, की ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.
पुढील दोन महिने सणासुदीचा काळ आहे. अशात केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काही नवे नियम जारी केले आहेत. आरोग्य सचिवांनी म्हटले, २१ सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे. आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणे गरजेचे असेल.
आरोग्य सचिवांनी सांगितले की, पुढील दोन महिने आठवडाभरात रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. मात्र, केरळ आणि महाराष्ट्रासहित काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाची भीती पूर्णपणे गेलेली नाही कारण येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत आहे. अशात सणासुदीच्या काळात केंद्र सरकार पूर्णपणे खबरदारी घेण्याच्या तयारीत आहे.