बोकारो : आशा सोडलेल्या 55 वर्षीय दुलारचंद मुंडा यांचे कोविड-19 लसीने आयुष्य सोपे केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून जीवनाशी लढा देत असलेले मुंडा कोविशील्ड लसीने केवळ बरे झाले नाहीत, तर त्यांच्या शरीरातही जीव आला आहे.
झारखंडमधील बोकारोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला कोरोनाची लस दिल्यानंतर तो अचानक बोलू लागला आहे. मुळात गेल्या 5 वर्षांपासून या व्यक्तीला बोलता येत नव्हतं. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर हा व्यक्ती पुन्हा बोलू लागल्याचा दावा करण्यात येतोय. 5 वर्षांपूर्वी एका अपघातात आवाज गमावलेल्या आणि गेल्या एक वर्षापासून पूर्ण बेडरेस्टमध्ये असलेल्या एका व्यक्तीने जेव्हा कोरोनाची लस घेतली, तेव्हा त्याच्या शरीरात असं काही घडलं की ज्यामुळे सर्वांनाच थक्क केले. लस दिल्यानंतर ती व्यक्ती बोलू लागली आणि त्याचे शरीर पूर्णपणे जिवंत झाले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दुलारचंद गेल्या काही वर्षांपासून अंथरूणाला खिळून होते. त्याच्या शरीराचे अनेक अवयव काम करत नव्हते आणि त्यांना नीट बोलताही येत नव्हते. दुलारचंद यांनी लस घेतल्यानंतर त्यांचा आवाज तर सुधारलाच, पण अपघातामुळे परिणाम झालेले अवयवही काम करू लागलेत. वैद्यकीय विभागाचे डॉ. अलबेल केरकेट्टा यांनी सांगितलं की, “दुलारचंद यांना 4 जानेवारी रोजी घरी कोरोनाची लस देण्यात आली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 जानेवारीला त्यांच्या शरीरात नव्याने हालचाली सुरु झाल्या. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. आम्ही जुने रिपोर्ट्सही पाहिले असून त्यांचा मणक्याचा त्रास लसीने कसा बरा झाला, हा तपासाचा विषय आहे.”