केंद्रशासित बेकायदा मद्याची वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुरिअरच्या वाहनातून राजरोसपणे होणारी मद्यवाहतूक रोखण्यात येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास यश आले आहे. थरारक पाठलाग करुन पथकाने ही मद्य वाहतूक उजेडात आणली आहे. या कारवाईत एका परप्रांतीयास बेड्या ठोकत पथकाने वाहनासह मद्यसाठा असा सुमारे २४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवा या केंद्रशासित प्रदेश निर्मीत आणि अन्य राज्यात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठ्याची शहरातून वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१०) भरारी पथकाने द्वारका भागात सापळा रचला होता. मुंबई आग्रा महामार्गाने धुळ्याच्या दिशेने भरधाव जाणाºया कुरिअरच्या पॅक बॉडी वाहणास पथकाने थांबण्याचा इशारा केला असता चालकाने आपले वाहन दामटले. त्यामुळे पथकाने पाठलाग करीत वाहन तपासणी केली असता त्यात रॉयल स्टॅग, एम्प्रीयल ब्ल्यू व्हिस्कीसह किंगफिशर या बिअर असा १४ लाखाचा मद्यसाठा मिळून आला. या कारवाईत राजस्थान येथील बिष्णोई नामक चालकास अटक करण्यात आली असून, वाहनासह मद्यसाठा असा सुमारे २४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयिताच्या चौकशीत या बेकायदा मद्यसाठ्याच्या माहितीचा उलगडा होणार असून, तो जिह्यात कि अन्य ठिकाणी वितरीत केला जाणार होता याबाबत स्पष्ट होणार आहे.