पाकिस्तानध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या सरकारकडून चांगल्या संबंधाची अपेक्षा भारताने केली होती. परंतु, इम्रान खान हे पाक सैन्याच्या हातातले बाहुले असल्याचा निशाणा भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी साधला आहे.
जी व्यक्ती पाक सैन्यदलाच्या इशार्यावर सरकार चालवत आहे त्या व्यक्तीकडून काय अपेक्षा कराव्यात. वाट पाहा आणि भविष्यात काय घडामोडी घडतात ते बघा, असे सिंह यांनी म्हटले आहे. इम्रान यांनी सत्तेवर येताच भारताशी चांगल्या संबंधाची अपेक्षा व्यक्त केली होती. भारताने जर एक पाऊल पुढे ठेवले तर पाकिस्तान दोन पावले पुढे येण्यास तयार असल्याचे म्हटले होते. परंतु, नवीन सरकार सत्तेवर येऊनही सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि घुसखोरीच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत.