शेती उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनी कृषी उडान योजना सुरू केली आहे. या योजनेत आतापर्यंत एकूण ५८ विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक या दोन विमानतळांचा समावेश आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली आहे.
कृषी उडान योजना 2.0 ची घोषणा 27 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आली होती. प्रामुख्याने डोंगराळ भाग, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत अन्न उत्पादनांची वाहतूक करण्यावर या योजनेचा मुख्य भर आहे. या योजनेत प्रामुख्याने ईशान्येकडील, डोंगराळ आणि आदिवासी प्रदेशांवर लक्ष केंदित करणारे 25 विमानतळ असून इतर प्रदेश/क्षेत्रातील 28 विमानतळांचा समावेश आहे. कृषी उडान 2.0 योजनेच्या मूल्यमापनानंतर, एकूण 58 विमानतळांमध्ये आणखी पाच विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.
कृषी उडान योजना 2.0 योजनेचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध साधनांमध्ये हवाई वाहतूकीचा वाटा वाढवणे आहे, ज्यामध्ये फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुधन आणि प्रक्रिया उत्पादने समाविष्ट आहेत. ही योजना शेतकर्यांना कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यास मदत करते .
सुरुवातीला 06 महिन्यांसाठी 53 विमानतळांचा प्रायोगिक प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर, पुनरावलोकनादरम्यान, त्यात आणखी 05 विमानतळ जोडले गेले आहेत अशा प्रकारे एकूण 58 विमानतळांचा यात समावेश करण्यात आला आहे. हे विमानतळ पुढीलप्रमाणे – आदमपूर, आगरतळा, अगाट्टी, आग्रा, अमृतसर, बागडोगरा, बरेली, भुज, भुंतर, चंदीगड, कोईम्बतूर, देहरादून, दिब्रुगड, दिमापूर, गग्गल, गोवा. , गोरखपूर, हिंडन, इंफाळ, इंदूर, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, जोरहाट, कानपूर, कोलकाता, लेह, लेंगपुई, लीलाबारी, नाशिक, पक्योंग, पंतनगर, पठाणकोट, पटना, पिथौरागढ, पोर्ट-ब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपूर , राजकोट, रांची, रुपसी, शिलाँग, शिमला, सिलचर, श्रीनगर, तेजपूर, तेजू, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, वाराणसी, विशाखापट्टणम, बेळगाव, भोपाळ, दरभंगा, जबलपूर आणि झारसुगुडा. नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.