लोकसभा निवडणुका आता अवघ्या 3 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. 22 जानेवारीच्या राममंदिराच्या उद्घाटनानंतर त्या कधीही लागू शकतात असा एक कयास आहे.
अशात भाजपा आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सक्षम पर्याय उभा करण्याचं आव्हान कडवं आव्हान काँग्रेस आणि सर्व विरोधीपक्षांसमोर आहे.
इंडिया आघाडीचा घाट त्यासाठीच घालण्यात आला आहे. पण 28 घोड्यांच्या या रथाचा सारथी कोण हाच प्रश्न मंगळवारी दिवसभर विचारला जात होता.
नवी दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी (19 डिसेंबर 2023) झालेल्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांच्या बैठकीनंतर हे नाव पुढे येईल असा कयास लावला जात होता. किमान जागा वाटपाचा मुलभूत फॉर्म्युला तरी सांगितला जाईल अशी अपेक्षा होती.
पण त्यापैकी काहीच पुढे आलं नाही. उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी भर पत्रकार परिषदेत किमान निमंत्रक तरी ठरवला जावा अशी मागणी केली.
तीन तासांची बैठक संपवून उद्धव ठाकरे तातडीनं बाहेर पडले आणि पत्रकारांचा एकच गराडा त्यांना पडला. तो चुकवून त्यांना जिन्यात गाठून “निमंत्रक ठरला आहे का?” असा सवाल मी त्यांना केला. त्यावर पत्रकार परिषदेत सर्व सांगितलं जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पण प्रत्यक्षात मल्लिकार्जुन खरगेंनी पत्रकार परिषदेत त्याबाबत काहीच सांगितलं नाही.
इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीचा अजेंडा भाजपनेच ठरवल्याची चर्चा त्यावेळी पत्रकारांमध्ये होती.
पत्रकार परिषद सुरू होताच खरगेंनी खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा सुरू करून ती चर्चा खरी ठरवली. मोदी सरकारनं केलेल्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडी 22 डिसेंबरला देशभरात निदर्शनं करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
मग एवढंच ठरवायचं होतं तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या नेत्यांना एका छताखाली आणायची काय गरज होती. एकमेकांना फोनाफोनी करून किमान एवढं ठरवता आलंच असतं.
खरगेंनी त्यांचं निवेदन संपवलं आणि जायला निघाले तर जयराम रमेश यांनी त्यांना पत्रकारांचे प्रश्न घ्या असं सूचवलं. अनिच्छेने का होईना हे तयार झाले. दोनच प्रश्न घेतले.
पहिलाच प्रश्न पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला का, असा आला. त्यावर आम्ही आधी जास्तीत जास्त खासदार निवडून आणू आणि मग तो ठरवू असं सांगून त्यांनी वेळ मारून नेली.
पण पुढचाच प्रश्न मी त्यांना ममता बॅनर्जींनी तुमचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवल्याच्या चर्चा आहेत, असा विचारताच त्यांची देहबोली थोडी आक्रमक झाली आणि म्हणाले,
“अरे भाई मी कितीवेळा सांगू की आधी आम्ही जिंकणार त्यानंतर आमचे खासदार लोकशाही पद्धतीने जे करतील त्यातून होऊन जाईल. सर्वांत आधी आम्हाला चिंता आहे जिंकण्याची आणि तुम्ही सर्व लोक त्या दिशेने विचार करा. हे नाही की कुणी काय बोललं आहे. ही तर आमची आतली बात आहे.”
एवढं बोलून त्यांनी पत्रकार परिषदच आटोपती घेतली. आता अर्थात हा प्रश्न त्यांना राहुल गांधींच्या उपस्थितीत विचारला.
आतली बात आहे असं बोलून त्यांनी एक प्रकारे दुजोराही दिला आणि दुसऱ्याच वेळी सवाल फेटाळूनही लावला.
थोड्याच वेळात मल्लिकार्जून खरगेंच्या ऑफिसकडून त्यांच्या संबोधनाचं प्रेस रिलीझ जारी करण्यात आलं. त्यात पंतप्रधानपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाचा उल्लेख होता. पण ममता बॅनर्जींबाबत विचारलेल्या प्रश्नाचा उल्लेख न करता त्यासंदर्भात दिलेलं उत्तर मात्र देण्यात आलं होतं.
काँग्रेसने शिताफीनं ममता बॅनर्जींचा उल्लेख त्यात टाळला आहे.
महत्त्वाचं म्हणजे खरगेंनी साधारण 9 मिनिटं निवेदन केलं आणि प्रश्न घेतले. त्यातले 5 मिनिटं ते मोदी सरकार आणि त्यांनी केलेल्या खासदारांच्या निलंबनाबाबत बोलले.
जर खरंच खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधक एवढे आक्रमक आहेत आणि त्यांना हा लोकशाहीवर असलेला घाला वाटत आहे तर त्यांच्या समोर एक नामी संधी होती.
ती म्हणजे विरोधकांच्या एकजुटीचा संदेश मोदी आणि भाजपाला देण्याची. त्यासाठी किमान सर्व नेत्यांनी एकाच मंचावर येऊन मीडियासमोर तरी एकजुटता दाखवायला पाहिजे होती. पण त्यात इंडिया आघाडीला सपशेल अपयश आलंय.
उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलिन, नितिशकुमार, लालू यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती यांच्यापैकी कुणीच पत्रकार परिषदेसाठी थांबलं नाही.
या नेत्यांची पत्रकार परिषदेच्या मंचावरील अनुपस्थिती ही बैठक खरंच सकारात्मक झाली का, हा प्रश्न विचाराला नक्कीच वाव देते.
खरगे विरुद्ध मोदी?
एकीकडे अशोका हॉटेलमध्ये तीन तास घमासान सुरू होतं आणि दुसरीकडे बाहेर उभ्या असलेल्या शंभरएक पत्रकारांमध्ये एकच चर्चा होती ती म्हणजे आज जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार.
जशी वेळ लांबत जात होती तसतसं अनेकजण वेगवेगळे फॉर्म्युला सांगत होते. पण पत्रकार परिषदेनंतर चर्चा होती ती मोदी विरुद्ध खरगे निवडणुकीची.
पहिला दलित पंतप्रधान म्हणून इंडिया आघाडी मल्लिकार्जुन खरगे यांना प्रोजेक्ट करू शकते, अशा चर्चांना वेग आला.
त्यात बैठकीनंतर विदुथलाई चिरुथाईगल काची(व्हीसीके)चे नेते थिरुमावलावन पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना म्हणाले की, "ममता बॅनर्जींनी मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे असा प्रस्ताव आमच्यासमोर मांडला आहे."
असं असेल तर खरगेंची देहबोली मात्र त्यासाठी सकारात्मक होती, असं सध्याच्या घडीला तरी म्हणता येणार नाही. आता त्याची कारणं अनेक असू शकतात.
मल्लिकार्जुन खरगे यांचं वय 80च्या पुढे आहे. तसंच सलग 9 वेळा गुलबर्ग्यातून निवडून येणाऱ्या खरगेंना गेल्या म्हणजेच 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारानं हरवलं आहे हे विसरता कामा नये.
शिवाय खरगे पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण नेते मात्र राहुल गांधी आहेत, असं अनेक बडे काँग्रेसचे नेते सतत म्हणत असतात.
मग अशा स्थितीत मल्लिकार्जुन खरगे नरेंद्र मोदींच्या तुलनेत कुठे उभे राहतात. हा प्रश्न मी एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारती यांना विचारला.
ते सांगतात, “राहुल गांधीच्या तुलनेत मोदींसमोर खरगे चांगलेच ठरतील. एक प्रकारे खरगेंचा चेहरा देऊन इंडिया आघाडी काउंटर नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करेल.”
“शिवाय खरगे पूर्ण वेळ राजकारणी आहेत. राहुल गांधी सारखे नाहीत. त्यांच्याकडे शरद पवारांएवढा अनुभव आहे. त्यांचा सर्वांशी संवाद आहे. त्यांच्या इमानदारीवर कुणीही शंका नाही घेऊ शकणार.”
त्यांचं नाव पुढे करण्यामागे एक रणनीति दिसते असं भारती यांना वाटतं. त्यांच्यामते खरगेंना उत्तर प्रदेशातून निवडणूक मैदानात उतरवलं जाऊ शकतं.
“आकडे सांगतात की बसपची सर्व मतं भाजपच्या बाजून जात आहेत. त्यामुळे त्या मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी इंडिया आघाडी खरगेंच्या नावावर डाव खेळू शकते. खरगे एक दलित नेते आहेत. त्यामुळे ते यूपीतून निवडणूक लढले तर बसपच्या मतांना इंडिया आघाडीकडे खेचण्यात यशस्वी ठरू शकतात.”
इंडिया आघाडीच्या 4 बैठका आतापर्यंत झाल्या आहेत. या बैठकाचं फलित काय असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे – सध्या तरी सर्व एकत्र येताना दिसत आहेत.
पण फक्त हे एकत्र येणं पुरेसं आहे का जेव्हा तुमच्या समोर भाजपसारख्या निवडणूक यंत्रणेचं आव्हान आहे? तर त्याचं उत्तर आहे - नाही
काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी या बैठकीआधी बीबीसीशी बोलताना आधी सांगितलं होतं की इंडिया आघाडीसाठी ही करो या मरोची स्थिती आहे.
बैठकीला आलेल्या बड्या नेत्यांना त्याची नक्कीच कल्पना असणार आहे. मग जे कळतंय ते वळत का नाहीये? त्यामुळेच मग प्रश्न उरतो तो म्हणजे मग 27 पक्षांच्या बड्या नेत्यांनी चौथ्यांदा एकत्र येऊन नेमकं काय साध्य केलंय?