भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचं नाव घेत नाही. चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं पाहायला पुन्हा एकदा मिळालं. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.
चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं होतं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सैन्याने तयार केलेल्या सहमतीच्या शर्तींचं उल्लंघन करत पूर्व लडाखच्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने चिनी सैन्यांना पांगोंग आणि पांगोंग लेक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चीन सैन्याचा डाव उधळून लावला आहे. सध्या तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं आणि शांतता पूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.