यंदाच्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) हंगामात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज 'स्कायमेट'ने व्यक्त केला आहे. स्कायमेट ही खासगी हवामानविषयक अंदाज देणारी संस्था आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्यामागे 'अल निनो'चा प्रभाव राहील, असेही सांगण्यात आले आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजामुळे यंदा शेतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
देशात पडणारा ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी इतका मानला जातो. ९० ते ९५ टक्क्यां दरम्यान पडणारा पाऊस सरासरीपेक्षा कमी मानला जातो. देशात १९५१ ते २००० दरम्यान दरवर्षी पडलेल्या पावसाची एकूण दीर्घकालीन सरासरी (एलपीए) ८९ सेंटीमीटर एवढी आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के राहील. तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ५५ टक्के आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.