भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 10 वी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने एकूण 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. भाजपने उत्तर प्रदेशमधून 7, पश्चिम बंगालमधून 1 आणि चंदीगडमधून 1 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नवीन यादीमध्ये, भाजपने ज्या सात जागांवर यूपीमधील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये मैनपुरी, कौशांबी, फुलपूर, अलाहाबाद, बलिया, मच्छिलिशहर आणि गाझीपूरचा समावेश आहे.
मैनपुरीमधून जयवीर सिंग ठाकूर, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पटेल, अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी, बलियामधून नीरज शेखर, मच्छलीशहरमधून बीपी सरोज आणि गाझीपूरमधून पारस नाथ राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने बलिया आणि अलाहाबादमधून उमेदवार बदलले आहेत. अलाहाबादच्या खासदार रिता बहुगुणा जोशी यांच्या जागी नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बलिया येथून भाजपने विद्यमान खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांचे तिकीट रद्द करून माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांना दिले आहे.
सपा अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार डिंपल यादव मैनपुरीमधून निवडणूक रिंगणात आहेत. अशा परिस्थितीत डिंपल यादव यांचा सामना सध्याच्या योगी सरकारमध्ये पर्यटन मंत्री असलेले भाजपचे जयवीर सिंह ठाकूर यांच्याशी होणार आहे. तर गाझीपूरमध्ये अफजल अन्सारी यांच्या विरोधात पारस नाथ राय हे भाजपचे उमेदवार असतील. तर संजय टंडन यांना चंदीगडमधून तिकीट देण्यात आले आहे. या जागेवरून दोन वेळा खासदार राहिलेल्या किरण खेर यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. किरण खेर यांनी 2014 आणि 2019 मध्ये दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली होती.
पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदार संघातून एस एस अहलुवालिया यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने या जागेवरून भोजपुरी स्टार पवन सिंग यांना उमेदवारी दिली होती. आता या जागेवरून टीएमसी ने अभिनेता शत्रुध्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.