भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर सडकून टीका केली आहे. राज्यातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असल्याने शिवसेनेच्या वक्तव्यांवर राजकीय महत्व प्राप्त होते. यातच शिवसेना अनेक दिवसापासून भाजपावर नाराज आहे. भाजपा व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार टीका सतत शिवसेना करत आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये,' असं म्हणत शिवसेनेनं नवीन वर्षाच्या सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेणे जोरदार टीका केली आहे
असा आहे अग्रलेख :
ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचेच नामजप होईल असे दिसते. या ‘बा–चा–बा–ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल?
सोनिया गांधी किंवा त्यांच्या काँग्रेसविषयी आम्हाला कणभरही ममत्व नाही, असण्याचे कारण नाही, पण राजकीय षड्यंत्रासाठी सरकारी यंत्रणांचा बेबंद वापर करू नये हे आमचे मत ठाम आहे. तीन हजार सहाशे कोटींच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारातील ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ‘ईडी’ने दिल्लीच्या कोर्टात दिली व त्यावरून काँग्रेस आणि भाजपात बाचाबाची सुरू झाली आहे. हा जो कोणी मिशेल की फिशेल आहे त्यास दुबईतून ताब्यात घेतले व दिल्लीस आणले तेव्हा पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार तापला होता व भाजपच्या बुडास आग लागली होती. पंतप्रधान मोदी यांनी एक-दोन मोठ्या प्रचारसभांत मिशेलचा उल्लेख करून सांगितले की, ‘आता बघा काय स्फोट होतात ते. ब्रिटनचा दलाल आणला आहे. आता मी कुणालाच सोडणार नाही.’ या सगळ्यांचा अर्थ आता लागत आहे. मिशेल हा सोनिया गांधींचे व त्यांच्या मुलाचे नाव घेणारच हे पक्के होते व तसे संकेत पंतप्रधानांना होते. मिशेलची चौकशी सुरू होण्याआधीच मोदी यांनी गांधींकडे बोट दाखवून तपासाची दिशा स्पष्ट केली हे जरा गमतीचे वाटते. मिशेल यास हिंदुस्थानात आणूनही पाच राज्यांत मोदीप्रणीत भाजपचा पराभव व्हायचा तो झालाच. पण मिशन मिशेलचे लक्ष्य 2019 आहे व तसे स्पष्टपणे दिसत आहे. मिशेल हा कोठडीत आहे व आतमध्ये काय सुरू आहे ते कुणालाच सांगता येत नाही. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाचा निकाल याचदरम्यान लागला व अमित शहा यांच्यासह सर्वच आरोपी निर्दोष सुटले. न्यायालयात म्हणे सीबीआय व इतर तपास अधिकाऱ्यांचे असे निवेदन आहे की, या प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांची नावे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता व त्याप्रकरणी ही नावे घेतली गेली. सत्ताबदल झाला नसता तर ही नावे त्या खून प्रकरणात तशीच राहिली असती. आता काँग्रेसवाले नेमके तेच सांगत आहेत. सोनियांचे नाव घेण्यासाठी मिशेलवर दबाव टाकला जात आहे. याचा सरळसोट अर्थ असा की, सरकारी यंत्रणा दोनचार लोकांच्या टाचेखाली आहे व राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांत गुंतवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची लाच वाटण्यात आली व देशाच्या माजी हवाई दलप्रमुखांना या प्रकरणात अटक झाली यापेक्षा धक्कादायक दुसरे काय असू शकेल! ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये. मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे.