पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री राहिलेले जे. पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी जोरदार चर्चा आहे. जे. पी. नड्डा यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नसून, नड्डा यांच्यासाठी पक्ष मोठा विचार करत आहे अशी चर्चा आहे.
भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले जे. पी. नड्डा यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली जाऊ शकते. भाजप अध्यक्षाची जबाबदारी अमित शहा यांनी यशस्वीपणे सांभाळली. पण आता अमित शहा यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे अध्यक्ष कोणाला केले जाणार हा प्रश्न पक्षापुढे आहे. नड्डा यांची ओळख संकटमोचक अशी आहे. उत्तरप्रदेशमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान त्यांनी दिले असून, लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असणाऱ्या उत्तरपदेशमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यात जे. पी. नड्डा यांनी महत्वाची भूमिका होती.
नड्डा यांनी यासाठी गुजरातमधील भाजपचे मंत्री राहिलेले गोवर्धन जडाफिया यांना सोबत घेऊन उत्तप्रदेशमध्ये एनडीए ला ५० % पेक्षा जास्त मते आणि ६४ जागा मिळवणे सुनिश्चित केले. अमित शहा यांनी नड्डा यांच्यावर उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपविली होती.२०१४ च्या विजयानंतर अध्यक्षपदासाठी नड्डा यांचे नाव चर्चेत होते.हिमाचल प्रदेशचे असलेले नड्डा २०१४ च्या वेळेस भाजपला मिळालेल्या यशानंतरही भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. तेव्हा भाजप अध्यक्ष असलेल्या राजनाथसिंह यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले होते त्यामुळे अध्यक्षपद रिकामे झाले होते. पण तेव्हा उत्तरप्रदेशमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अमित शहा यांनी बाजी मारली. तेव्हा नड्डा यांना आरोग्यमंत्रीपद देण्यात आले होते. यावेळेस मात्र जे. पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.