पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्टार्ट अप्सशी संवाद साधताना मोठी घोषणा केली. यापुढे दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय स्टार्ट-अप डे' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.पीएम मोदींनी शनिवारी स्टार्टअप उद्योगपतींशी संवाद साधताना त्यांच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन साजरा करण्याची घोषणा करताना मोदी म्हणाले की, स्टार्टअप्सच्या जगात भारताचा झेंडा रोवणाऱ्या देशातील सर्व कल्पक तरुणांचे खूप खूप अभिनंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्टार्टअपची ही संस्कृती दूरवर पोहोचली पाहिजे, त्यामुळे आता दरवर्षी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएम मोदींनी सरकारी प्रक्रियेच्या जाळ्यातून उद्योजकता, नवकल्पना मुक्त करण्याचे आवाहन केले. नवीन कल्पनाला चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना सांगितले की, नाविन्यपूर्णतेबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम असा झाला आहे की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताच्या क्रमवारीतही बरीच सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर आहे. भारतातील स्टार्टअप्स जगातील इतर देशांमध्ये सहज पोहोचू शकतात. त्यामुळे तुमची स्वप्ने फक्त स्थानिक ठेवू नका तर ती जागतिक बनवा. असे ही त्यांनी म्हटले आहे.