येत्या काही वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचं वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. जम्मू येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 83 वा स्थापना दिन साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जवानांना संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले की, "देशाला आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला स्वत:पेक्षा महत्व आणि प्राधान्य देण्याची परंपरा सीआरपीएफ ने कायम ठेवली आहे. हीच त्याग आणि बलिदानाची परंपरा, त्याच समर्पित वृत्तीने या दलाचे जवानही पुढे नेतील, अशी मला खात्री आहे. देशातील युवा पिढीला देखील या जवानांचे समर्पण आणि त्यागाविषयी मोठा आदर आहे."
ते पुढे म्हणाले की, "जिथे कुठेही संकटाची परिस्थिती असते, तिथे सीआरपीएफचे जवान पोहोचतात. तेव्हा लोकांना पूर्ण विश्वास वाटतो की आता ते परिस्थिती नियंत्रणात आणतील. या दलांचे कित्येक वर्षांचे परिश्रम आणि त्यांचा गौरवास्पद इतिहास यातूनच त्यांच्याविषयी हा विश्वास निर्माण झाला आहे.
"2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. पुढील काही दिवसांत येथे सीआरपीएफ तैनात करण्याची आवश्यकता राहणार नाही."