• सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर 3 जानेवारी 2022 पासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे.
• गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचं संकट उंबरठ्यावर उभं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाच्या निर्णयाला अधिकच महत्त्व प्राप्त होत असल्याचं दिसून येतं.
• सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेलं हे नवं कोरोना व्हेरियंट संपूर्ण जगाची डोकेदुखी बनलं आहे. आता भारतातही या व्हेरियंटने बाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारी सांगते.
• ओमिक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.
• त्या अंतर्गत 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात येईल.
• तर 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी तसंच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लशीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यात येणार आहे.
• भारतात आतापर्यंत कोरोना लशीचे 144 कोटींपेक्षाही अधिक डोस देण्यात आले आहेत.
• यामध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात 84 कोटी पहिले डोस देण्यात आलेले असून 60 कोटी दुसरे डोस देण्यात आले आहेत.
• तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, लसीकरणाच्या या टप्प्यात 8 ते 9 कोटी लहान मुलांना कोरोना लस देण्यात येईल.
• कसं होणार लहान मुलांचं लसीकरण?
• 15 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचं लसीकरण करत असताना केवळ भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोव्हॅक्सीन हीच लस त्यांना देण्यात येईल.
• लस मिळवण्यासाठी 15 पेक्षा अधिक वयाच्या मुलांनी आधीच्याच Co-Win वेबसाईटवर रजिस्टर करायचं आहे.
• 2007 किंवा त्यापेक्षा आधी जन्म झालेल्या किशोरवयीन मुला-मुलींना याचा लाभ घेता येईल.
• त्यासाठी Co-Win वेबसाईटवर आधीपासून वापरलेल्या किंवा नव्या मोबाईल नंबरचा वापर केला जाऊ शकतो.
• ज्यांना शक्य नाही, ते व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
• डॉ. सुनिला गर्ग या इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव अँड सोशल मेडिसीन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
• त्या लॅन्सेट कोव्हिड-19 कमिशन इंडिया टास्क फोर्सच्या सदस्यही आहेत.
• त्या म्हणतात, "मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण या वयोगटातील मुलं प्रौढ होण्याच्या मार्गावरच असतात. त्यामुळे प्रौढांना दिल्या जाणाऱ्या लशीचा डोस त्यांना दिला जाऊ शकतो.
कोव्हॅक्सिन लस कशामुळे?
कोव्हॅक्सिन लशीचे निर्माते भारत बायोटेकने याबाबत बोलताना म्हटलं, "पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लस लहान मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं आढळून आलं."
भारत बायोटेकची चाचणी जून 2021 ते सप्टेंबर 2021 दरम्यान 525 लहान मुलांवर करण्यात आली.
ही चाचणी तीन वयोगटांमध्ये विभाजित करण्यात आली होती. पहिला गट 12 ते 18, दुसरा गट 6 ते 12 तर तिसरा गट 2 ते 6 वर्षे वयोगटाचा होता.
या चाचणीतून मिळालेली माहिती सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला ऑक्टोबर 2021 मध्ये देण्यात आली.
नुकतीच ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया यांनीही या लशीच्या 12 ते 18 वयोगटाकरिता वापरासाठी मंजुरी दिली.
या चाचणीदरम्यान मुलांवर कोणताच प्रतिकूल परिणाम आढळून आला नाही. 374 मुलांमध्ये सौम्य स्वरूपात काही लक्षणं दिसून आली. पण त्यापैकी 78.6 टक्के मुलांची तब्येत एका दिवसात ठणठणीत बरी झाली.
इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी होणारी वेदना हेच प्रमुख लक्षणं बहुतांश जणांमध्ये आढळून आलं.
भारत बायोटेकने म्हटलं, "कोव्हॅक्सिन विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आली आहे. प्रौढ आणि मुले यांना समान लस देण्यात येऊ शकते."
ओमिक्रॉनच्या भीतीने निर्णय घेतला?
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या मते, "ओमिक्रॉनमुळे लहान मुलांना धोका वाढलेला नाही. जितका धोका मुलांना आधीपासून होता, तितकाच अजूनही आहे. त्यामुळे हा निर्णय ओमिक्रॉनशी जोडून पाहू नये."
डॉ. लहरिया म्हणतात, "मुलांमध्ये गंभीर आजार होण्याचं प्रमाण मुळातच कमी असतं. पण लहान मुलांकडून इतरांना होणारा संसर्ग रोखणं महत्त्वाचं आहे.
ते सांगतात, "मुलांना लस देण्याबाबत संपूर्ण सहमती नव्हती. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना कधीच लस दिली जाणार नाही. कोणत्या वयाच्या मुलांना प्राथमिकता द्यावी, हाच प्रमुख प्रश्न होता."
डॉ. लहरिया यांच्या मते, "प्रौढांचं लसीकरण यालाच सर्वाधिक प्राधान्य आहे. मुलांमध्ये 12 ते 17 वयाची मुले हायरिस्कमध्ये असल्याने त्यांना लस देता येऊ शकते."
तर डॉ. सुनीला गर्ग यांच्या मते, "ओमिक्रॉन व्हेरियंट आल्यापासून हे संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे."
लहान मुलांना लस दिली पाहिजे, असं लोक म्हणत होते. पण हा निर्णय घेतल्यानंतर काही लोकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. 80 च्या दशकातही लसीकरण अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लोकांनी उदासीनता दर्शवली होती. तेच यावेळीही पुन्हा दिसून येतं."
त्या म्हणतात, "आधीपासूनच व्याधींनी ग्रस्त असलेल्या मुलांसाठी लस वरदान ठरू शकते. नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणात मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचं दिसून येतं. 100 पैकी 4 मुलांमध्ये ही समस्या आहे."
आता पुढे काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात 15 पेक्षा कमी वयाच्या मुलांचंही लसीकरण सुरू केलं जाऊ शकतं.
डॉ. सुनीला गर्ग म्हणतात, "आता 15 पेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणाबाबतही विचार करायला हवा. 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देता येऊ शकते."
डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात, "आगामी काळात नेझल व्हॅक्सीन येणार आहे. ती मुलांना आजारापसोबतच संसर्ग पसरवण्यापासूनही वाचवेल. काही देशांनी 12 पेक्षा कमी वयाच्या मुलांनाही लस देणं सुरू केलं आहे. बहुतांश देशांमध्ये मुलांचं लसीकरण अजूनही सुरू झालेलं नाही. पण बहुतांश देश सध्या तरी 12 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाच प्राधान्य देत आहेत. देशातील परिस्थिती, प्रक्रिया यांवरही बरंच काही अवलंबून असू शकतं."
डॉ. सुनिला गर्ग यांच्या मते, झायकोव्ह-डी, कोर्बेव्हॅक्स आणि नेझल व्हॅक्सीन आल्यानंतर 15 वर्षांच्या खालील वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत विचार करण्यास हरकत नाही.