वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याबद्दलच्या सूचनेचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे उदाहरण दिले. ते म्हणाले कि, “पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार. तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार. पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही”. पंतप्रधानांना हे उदाहरण इतके आवडले कि त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असे सांगितले.