राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शुक्रवारी (25 जून) कानपूर दौऱ्यावर होते. यादरम्यान वाहतूक रोखल्यामुळे एका आजारी महिलेचं निधन होण्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी माफी मागितली असून 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं आहे.
कानपूरचे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी महिलेल्या अंत्यसंस्कारात दाखल होऊन राष्ट्रपतींचा शोक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला.
मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव वंदना मिश्रा असं होतं. त्या इंडियन असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या कानपूर शाखेच्या महिला आघाडीच्या प्रमुख होत्या.
कानपूर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाने ट्वीट करून लिहिलं, "महामहीम राष्ट्रपती हे वंदना मिश्रा यांच्या अकस्मात निधनामुळे दुःखी झाले आहेत. त्यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी आपला शोक संदेश संतप्त कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यास सांगितलं आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कारांध्ये सहभागी होऊन शोकाकुल कुटुंबीयांपर्यंत राष्ट्रपतींचा संदेश पोहोचता केला."
पोलिसांच्या मते, राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परिसरातील वाहतूक आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ रोखण्यात आली होती. याप्रकरणी दोषी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
कानपूर पोलीस आयुक्त कार्यालयाने म्हटलं, "सुरक्षिततेच्या नावाने नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत. वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीत तर ही वेळ कधीच येऊ नये. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ही यंत्रणा सुधारण्यासाठी पाऊल उचलण्यात येत आहेत. सूचनेपेक्षा जास्त वेळ वाहतूक रोखल्याबद्दल पोलीस अधिकारी सुशील कुमार आणि इतर तिघांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त करतील."
राष्ट्रपतींचा तीन दिवसीय दौरा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. ते शुक्रवारी एका विशेष रेल्वेने आपल्या मूळ गावी कानपूरला पोहोचले.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वेस्थानकातून त्यांचा प्रवास सुरू झाला. ते कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर उतरले.
शुक्रवारी कानपूर रेल्वे स्थानकावर राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान, सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. रेल्वेगाडीत NSG सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.
राष्ट्रपतींच्या या रेल्वेत दोन विशेष बुलेटप्रूफ कोचही जोडण्यात आले होते.